फक्त तीन मिनिटं वडिलांचं अंत्यदर्शन घेतलं अन् तिच्या अश्रूंचा बांधच फुटला!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 01:15 PM2020-06-05T13:15:42+5:302020-06-05T13:25:52+5:30
कांगपोक्पी येथे राहणारी अंजली 25 मे रोजी श्रमिक स्पेशल ट्रेनमार्गे चेन्नईहून इंफाळला आली.
मणिपूर येथील 22 वर्षीय अंजलीच्या वडिलांचा मंगळवारी मृत्यू झाला. तिला अखेरच्या क्षणी वडिलांचे अंत्यदर्शन सुद्धा व्यवस्थित घेता आले नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी फक्त तीन मिनिटे दिली. यावेळेत तिने वडिलांचे अंत्यदर्शन घेतले आणि पुन्हा तिला क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात आले.
कांगपोक्पी येथे राहणारी अंजली 25 मे रोजी श्रमिक स्पेशल ट्रेनमार्गे चेन्नईहून इंफाळ येथे आली. ट्रेनमध्ये अंजलीचा सहकारी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यानंतर, तिलाही क्वारंटाईन करण्यात आले. यादरम्यान, अंजलीचे वडील बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोग्य प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतल्यानंतर आणि पीपीई किट परिधान केल्यानंतरच अंजलीला तिच्या वडिलांचे अंत्यदर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, तिला फक्त वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी तीन मिनिटे दिली होती.
वडिलांचे अंत्यदर्शन घेताना अंजलीचे अश्रू अनावर झाले होते. तसेच, वडिलांच्या मृतदेहाजवळ जाऊन त्यांना निरोप देत असताना तिची आई, नातेवाईक किंवा शेजाऱ्यांच्या जवळ जाण्याची तिला परवानगी नव्हती. त्यामुळे अंजली समोर रडत असताना तिच्या आईकडे मात्र, तिला पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्व लक्ष मात्र घड्याळाकडे होते. तीन मिनिटे पूर्ण होताच तिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला क्वारंटाईन सेंटरमध्ये नेले. बुधवारी अंजलीच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आणखी बातम्या...
पाकचं नापाक कृत्य, आयएसआय एजंटकडून भारतीय राजदूतांचा पाठलाग!
मीरारोडमध्ये दुहेरी हत्याकांड; बारमधील दोन कर्मचाऱ्यांची हत्या
BSNLच्या ग्राहकांसाठी खूशखबर! 'या' प्लॅनमध्ये आता सप्टेंबरपर्यंत मिळणार 300GB डेटा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर, कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच जाणार मुंबई बाहेर