आता घरबसल्या करा कोरोना चाचणी! अवघ्या ३२५ रुपयांत लाँच केली जबरदस्त किट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 06:07 PM2021-07-12T18:07:17+5:302021-07-12T18:08:14+5:30
आरोग्य सेवा क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक प्रमुख कंपनी असलेल्या अॅबॉट (Abbott) कंपनीनं ज्येष्ठ आणि लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षण असणाऱ्यांसाठी घरच्या ...
आरोग्य सेवा क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक प्रमुख कंपनी असलेल्या अॅबॉट (Abbott) कंपनीनं ज्येष्ठ आणि लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षण असणाऱ्यांसाठी घरच्या घरी कोरोनाची चाचणी (Covid-19 Home-Testing Kit) घेता येईल असं खास किट तयार केलं आहे. या किटची किंमत अवघी ३२५ रुपये इतकी असणार आहे.
अॅबॉट कंपनीच्या माहितीनुसार येत्या काळात लाखोंच्या संख्येनं कोविड-१९ रॅपिड अँटिजन परिक्षण किट उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ज्यांचा वापर खासगी स्वरुपात अगदी घरच्या घरी करता येणार आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवरील ओझं कमी होण्यास खूप मोठी मदत होणार आहे, असा दावा कंपनीनं केला आहे. या किटच्या माध्यमातून घरच्या घरी कोरोना चाचणी नागरिकांना करता येणार आहे. या टेस्टिंग किटच्या मदतीनं होम आयोलेशनमध्ये वाढ होईल आणि व्हायरसच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात मदत होईल, असं मत आयसीएमआरचे माजी संचालक जनरल निर्मल कुमार गांगुली यांनी व्यक्त केलं आहे.
कोरोना चाचणीच्या या किटमुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात मोठं यश प्राप्त होईल आणि जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ७० लाख किट दाखल होतील. याशिवाय गरज भासल्यास मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन करण्याची कंपनीची क्षमता असल्याचं कंपनीचे आशियाई उपाध्यक्ष संजीव जोहर यांनी सांगितलं.
किती येईल खर्च?
या टेस्ट किटचं नाव अॅबॉट Panbio COVID-19 अँटिजन टेस्टिंग किट असं ठेवण्यात आलं आहे. एका किटची किंमत ३२५ रुपये इतकी असून ४ पॅक किटची किंमत १,२५० रुपये इतकी आहे. तर १० पॅक किटची किंमत २८०० रुपये व २० पॅक किटची किंमत ५४०० रुपये इतकी आहे.