Hathras Gangrape : ...म्हणून हाथरसमध्ये पीडितेच्या गावातील सर्वांची झाली कोरोना चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 08:51 AM2020-10-07T08:51:36+5:302020-10-07T09:01:29+5:30

Hathras Corona Test : हाथरसमध्ये सामूहिक बलात्कार पीडितेच्या गावातील सर्व लोकांची मंगळवारी कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

corona test was conducted for entire village of victim in hathras this is reason | Hathras Gangrape : ...म्हणून हाथरसमध्ये पीडितेच्या गावातील सर्वांची झाली कोरोना चाचणी

Hathras Gangrape : ...म्हणून हाथरसमध्ये पीडितेच्या गावातील सर्वांची झाली कोरोना चाचणी

Next

हाथरस - हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे देशात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही 66 लाखांवर गेली आहे. याच दरम्यान हाथरसमध्ये सामूहिक बलात्कार पीडितेच्या गावातील सर्व लोकांची मंगळवारी कोरोना चाचणी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी येथे काही पत्रकार आणि सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. 

उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून हाथरसमध्ये सतत राजकीय पक्षांचे नेते आणि पत्रकारांची ये-जा सुरू होती. हे पाहता गावातील लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. याचा विचार करूनच ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबातील सर्व सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. पीडितेच्या गावातील लोकांच्या करोना चाचणीचे रिपोर्ट 24 तासांत येण्याची शक्यता आहे.

200 अज्ञात लोकांविरोधात एफआयआर दाखल

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद आणि इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हाथरथ गावाचा दौरा केलेला आहे. तसेच पत्रकारांची गर्दी देखील पाहायला मिळत आहे. भाजपाचे माजी आमदार राजवीर सिंह पहलवान यांच्या विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कलम 144 चे उल्लंघन करणे आणि साथीच्या आजाराच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाथरस पोलिसांनी 200 अज्ञात लोकांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. 

पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट 

राजवीर सिंह यांनी रविवारी आपल्या घरी सवर्ण समाजाची पंचायत बोलावली होती. अशा प्रकारची पंचायत आयोजित करण्याला विरोध का केला नाही यावरून पोलीस, प्रशासनाला देखील सवाल विचारला जात आहे. अलीगडचे पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस आयुक्तांनी पीडितेच्या कुटुंबीयांची मंगळवारी भेट घेतली. उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अवनीश अवस्थी आणि पोलिस महासंचालक हितेश चंद्र यांनी देखील पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण

हाथरसमधील एका तरुणीवर 14 सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तसेच पीडित युवतीची आरोपींनी जीभही कापल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच पीडितेच्या मणक्याचे हाडही मोडले होते. क्रूरपणे बलात्कार झालेल्या तरुणीला उपचारांसाठी प्रथम अलीगडमधील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर तिला अधिक उपचारांसाठी दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र तिथे उपचारांदरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पीडितेवर घाईगडबडीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याने उत्तर प्रदेशचे सरकार टीकेचे लक्ष्य होत आहे. पीडित तरुणीवर पोलिसांनी जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

Web Title: corona test was conducted for entire village of victim in hathras this is reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.