भारतात तिसऱ्या लाटेची मध्यावस्था सुरू; फेब्रुवारीत गाठणार कळस, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 09:19 AM2022-01-10T09:19:30+5:302022-01-10T09:19:44+5:30
सध्या तिसऱ्या लाटेची मध्यावस्था सुरू आहे.
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सध्या मध्यावस्था सुरू आहे. संसर्गाच्या प्रसाराचा वेग वाढत राहिला तर तिसरी लाट फेब्रुवारी महिन्यात कळस गाठण्याची शक्यता आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी सचिव डॉ. रवी मलिक यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, सध्या तिसऱ्या लाटेची मध्यावस्था सुरू आहे. ओमायक्राॅन हा कोरोनाच्या इतर विषाणूंपेक्षा कमी घातक आहे. हा नवा विषाणू फुप्फुसांवर नव्हे तर श्वसनमार्गाला अधिक संसर्ग करतो. त्याची लक्षणे सौम्य असली तरी आपण योग्य ते उपचार करून घेतले पाहिजेत. ओमायक्रॉनमध्ये देखील भविष्यात आणखी परिवर्तन होणार आहे. कोणतीही साथ ही तीन ते चार लाटांनंतर संपुष्टात येते, असा आजवरचा इतिहास आहे.
डॉ. रवि मलिक म्हणाले की, कोरोना संसर्गाविषयी साऱ्या जगालाच नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे. कोरोना विषाणूचे आणखी काही नवे प्रकारही संसर्ग फैलावू शकतात. त्यामुळे ही साथ कधी संपुष्टात येईल याबद्दल आताच काही सांगणे योग्य नाही.
लडाखमध्ये आणखी ५९ जण बाधित
देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून लडाखमध्ये गेल्या २४ तासांत ५९ नवे रुग्ण सापडले. तेथील एकूण रुग्णसंख्या २२ हजार झाली आहे. पुडुचेरीमध्ये आणखी ४४४ कोरोनाबाधित सापडले असून, रुग्णांचा आकडा १ लाख ३० हजारांवर पोहोचला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये संसर्गदर ९.४ टक्के झाला आहे.
अमृतसरमधील चाचण्यांची होणार चौकशी
इटलीवरून विमानाने अमृतसर येथे आलेल्यांपैकी काही जणांनी आम्ही कोरोनाबाधित नसून, चाचणी अहवाल चुकीचे आहेत असा आरोप केला. त्याची दखल घेऊन या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) दिले आहेत. एका खासगी प्रयोगशाळेकडून या चाचण्या करण्यात आल्या आहेत.