सोन्याच्या तस्करीला कोरोनामुळे लागला ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 06:06 AM2020-09-22T06:06:53+5:302020-09-22T06:07:12+5:30
एप्रिलमध्ये भारतीय विमानतळांवर अवघे २०.६ किलो तस्करीचे सोने पकडले गेले. हा मागील सहा महिन्यांचा नीचांक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीमुळे भारतात होणाऱ्या सोन्याच्या तस्करीचे कंबरडे मोडले आहे. कोविड-१९ महामारीपूर्वी महिन्याला सुमारे २५ टन सोने तस्करीच्या मार्गाने भारतात येत होते. त्याचे प्रमाण आता अवघे २ टनांवर आले आहे, असे अखिल भारतीय रत्ने व आभूषणे देशांतर्गत परिषदेचे चेअरमन एन. अनंत पद्मनाभन यांनी सांगितले आहे.
जागतिक सोने परिषदेच्या अंदाजानुसार, गेल्या वर्षी १२० टन सोने तस्करीच्या मार्गाने भारतात आणले गेले होते. भारतातील एकूण वार्षिक मागणीच्या तुलनेत हे प्रमाण १७ टक्के होते.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, आता लॉकडाऊन काळातील निर्बंध हळूहळू उठविले जात असले तरी कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत अमेरिकेनंतर दुसºया स्थानावर आहे. त्यामुळे भारताने आपल्या सीमा अजूनही खुल्या केलेल्या नाहीत. त्यामुळेही सोने तस्करी नियंत्रणात आहे.
पद्मनाभन यांनी सांगितले की, मागील सहा महिन्यांपासून विमानांचे उड्डाण बंद आहे. त्यामुळे हवाईमार्गे होणारी सोने तस्करी जवळपास बंद पडली आहे. खुष्कीच्या मार्गाने नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथून अत्यल्प प्रमाणात तस्करीचे सोने भारतात येत आहे.
सोने वापरण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे येथील सोन्याची मागणीही मजबूत असते. त्याचा लाभ तस्करांना होत असतो; पण आता लॉकडाऊनमुळे मागणीच घटल्याने सोने तस्करीचेही कंबरडे मोडले
आहे.
एप्रिलमध्ये भारतीय विमानतळांवर अवघे २०.६ किलो तस्करीचे सोने पकडले गेले. हा मागील सहा महिन्यांचा नीचांक आहे.
विमान वाहतूक बंद असल्याचा परिणाम
च्मार्च महिन्यात लागू करण्यात आलेले लॉकडाऊन, तसेच बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक याचा तस्करीवर मोठा परिणाम झाला. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था डबघाईला
आल्यामुळे सोन्याची मागणीही घटली आहे. त्यामुळेही तस्करीमध्ये घट झाली आहे.