Corona Unlock: देशातील सर्व स्मारकं आणि संग्रहालय १६ जूनपासून खुली होणार, ASI ची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 04:13 PM2021-06-14T16:13:35+5:302021-06-14T16:14:21+5:30
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून परिस्थिती पुन्हा एकदा रुळावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतला आहे.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून परिस्थिती पुन्हा एकदा रुळावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व केंद्रीय संरक्षित स्मारकं आणि संग्रहालयं १६ जूनपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील सर्व स्मारकं, स्मृतीस्थळं, ऐतिहासिक स्थलं आणि संग्रहालयं १५ जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पुरातत्व खात्यानं घेतला होता. त्यानुसार देशातील ३,६९३ स्मारकं आणि ५० संग्रहालयं पर्यटकांसाठी गेल्या मोठ्या कालावधीपासून बंद होती. अखेर १६ जूनपासून ही सर्व स्मारकं आणि संग्रहालयं पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. कोरोना रुग्णांमध्ये घट न झाल्यास स्मारकं आणि संग्रहालयं बंद ठेवण्याचा कालावधी वाढवावा लागेल असं याआधी सांगण्यात आलं होतं. पण गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत असल्याचं दिसून येत आहे. याच दिलासादायक चित्रामुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं आज महत्वाचा निर्णय घेतला आहे.
All Centrally protected monuments/sites and museums under ASI will be opened from 16th June: Archaeological Survey of India pic.twitter.com/Kig3w0AEEt
— ANI (@ANI) June 14, 2021
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून म्हणजेच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशातील सर्व स्मारकं आणि संग्रहालयं गेल्या वर्षी बंद करण्यात आली होती. त्यानंतर जुलै २०२० मध्ये सांस्कृतिक मंत्रालयानं स्मारकं, संग्रहालयं, पर्यटनस्थळं, पूजा स्थळं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण यासाठी भेट देणाऱ्या पर्यटकांना कोरोना संबंधी नियमांचं पालन करण्याचे सक्त आदेश देण्यात आले होते. यात मास्कचा वापर करणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक करण्यात आलं होतं.