Corona Vaccination: देशातील १० कोटी जनतेने वाढवली सरकारची चिंता; ICMR चे धोक्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 03:10 PM2021-10-20T15:10:10+5:302021-10-20T15:11:26+5:30
भारतात आतापर्यंत ९९.१९ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशातील ७० कोटी जनतेला कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे
नवी दिल्ली – कोरोनामुळे सगळ्या देशासमोर संकट उभं राहिलं आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीनं अनेकांचा जीव घेतला आहे. सध्या कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केवळ लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. यात भारत एकीकडे १०० कोटी लसीचे डोस देण्याचं लक्ष्य गाठत असताना दुसरीकडे कोरोना व्हॅक्सिनेशनबाबत (Corona Vaccination in India) मोठी समस्या पुढे आल्यानं सरकारचं टेन्शन वाढलं आहे.
देशात १० कोटी लोक असे आहेत ज्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. परंतु दुसरा डोस घेण्यासाठी आलेच नाहीत. नीती आयोगाचे सदस्य व्हि. के पॉल यांनी दुसरा डोस घेणाऱ्यांचे कमी प्रमाण पाहता चिंता व्यक्त केली आहे. लोकांनी पुढे येऊन दुसरा डोस घ्यावा असं आवाहनही त्यांनी केले आहे. देशात आजही १० कोटी लोक असे आहेत ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला परंतु दुसरा डोस घेण्यासाठी पुढे आलेच नाहीत असं व्हि. के पॉल यांनी सांगितले.
दोन्ही डोसनं चांगली इम्युनिटी मिळते
पॉलने सांगितले की, व्हॅक्सिनच्या एका डोसनं कोरोनाविरुद्ध तात्पुरतं इम्युनिटी मिळते. तर दोन्ही डोस घेतल्यानंतर चांगली इम्युनिटी मिळते. तर बूस्टर डोसच्या आवश्यकतेवर पॉल यांनी स्पष्टपणे बोलले. वैज्ञानिकांनी बूस्टर डोसची गरज आहे की नाही हे निश्चित करावं. अमेरिकेसह काही देशांमध्ये बूस्टर डोसला मंजुरी देण्यात आली आहे.
भारतात १०० कोटींपर्यंत लसीकरण
भारतात आतापर्यंत ९९.१९ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशातील ७० कोटी जनतेला कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर २८ कोटीहून अधिक लोकांचे पूर्ण लसीकरण झालं आहे. हा आकडा अनेक देशाच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. भारतात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
भारतासाठी दिलासादायक चित्र
मागील २४ तासांत देशात कोरोनाचे १४ हजार ६२३ रुग्ण आढळले तर १९७ रुग्णांचा मृत्यू झाला. १९ हजार ४४६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले. आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख रुग्ण समोर आले होते. त्यात सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ७८ हजार ९८ इतकी आहे. देशात ४.५२ लाख लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. देशात कोरोनाचे आर मूल्य देखील १ पेक्षा कमी आहे.