Corona Vaccination: १२ ते १४ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाला फेब्रुवारीच्या अखेरपासून सुरुवात होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 07:08 AM2022-01-18T07:08:33+5:302022-01-18T07:09:12+5:30
Corona Vaccination: गेल्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर आतापर्यंत ३ कोटींपेक्षा अधिक मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला.
नवी दिल्ली : १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्यापासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे, असे लसीकरणासंदर्भातील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले.
ते म्हणाले की, गेल्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर आतापर्यंत ३ कोटींपेक्षा अधिक मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. ही मोहीम अतिशय वेगाने राबविली जात आहे. देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील ७.४ कोटी मुले असून त्या सर्वांना या महिन्याच्या अखेरीपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस देण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे.
डॉ. एन. के. अरोरा म्हणाले, १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा शाळा, महाविद्यालयांसहित अनेक ठिकाणी संचार असतो. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण प्रथम हाती घेतले आहे. आता १२ ते १४ वर्षे वयाच्या मुलांना लस देण्याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेईल.
सहव्याधीग्रस्त मुलांना प्राधान्याने लस द्या
५ ते १४ वर्षे वयोगटातील सहव्याधी असलेल्या मुलांना कोरोनाचा तीव्र स्वरूपाचा संसर्ग होण्याचा धोका असतो.
त्यामुळे अशा मुलांना केंद्र सरकारने प्राधान्याने कोरोना लस द्यावी, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.
१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना सध्या भारत बायोटेकने बनविलेली कोव्हॅक्सिन लस देण्यात येते. १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीनसाठी केंद्र सरकारने कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे.