Corona Vaccination : दुसऱ्या व प्रिकाॅशन डोसमध्ये 12 महिन्यांचे अंतर?, अंतिम निर्णय लवकरच होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 05:39 AM2021-12-27T05:39:49+5:302021-12-27T05:40:20+5:30
Corona Vaccination : ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे या लसींच्या दोन डोसमध्ये यापुढील काळात किती अंतर ठेवावे याचाही निर्णय केंद्र सरकार घेण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : कोरोना लसीच्या दुसऱ्या व प्रिकॉशन डोसमध्ये नऊ ते बारा महिन्यांचे अंतर ठेवले जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल.
ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे या लसींच्या दोन डोसमध्ये यापुढील काळात किती अंतर ठेवावे याचाही निर्णय केंद्र सरकार घेण्याची शक्यता आहे. देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे ३ जानेवारीपासून तर आरोग्यसेवक, अन्य कोरोना योद्धे, ६० वर्षांहून अधिक वय व एकाहून अधिक व्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना १० जानेवारीपासून प्रिकॉशन डोस त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जाहीर केले होते.
दोन डोस घेतलेल्या लोकांना देण्यात येणाऱ्या प्रिकॉशन डोसला नरेंद्र मोदी यांनी बुस्टर डोस म्हणण्याचे टाळले होते. त्यामुळे लसीकरण मोहिमेत आता देण्यात येणाऱ्या लसींपेक्षा आणखी निराळी लस प्रिकॉशन डोस म्हणून दिली जाण्याची शक्यता आहे.
प्रिकाॅशन डोससाठी तीन लसींचे पर्याय
- प्रिकाॅशन डोससाठी तीन लसींचे पर्याय चर्चेत आहेत. बायोलॉजिकल ईने विकसित केलेल्या कोर्बेवॅक्स या लसीचे ३० कोटी डोस बनविण्यासाठी या कंपनीला १५०० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली आहे.
- नोवोवॅक्स कंपनीने बनविलेली व सीरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादित होणारी कोव्होवॅक्स ही लस तसेच भारत बायोटेकच्या नाकाद्वारे देण्याच्या डोसचाही विचार प्रिकॉशन डोससाठी होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.