Corona Vaccination: 26 दिवसांत 70 लाख लोकांना कोरोना लस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 05:30 AM2021-02-12T05:30:51+5:302021-02-12T05:31:08+5:30
देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट
नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाच्या उपचाराधीन रुग्णांच्या प्रमाणात आणखी घट झाली असून, ते आता अवघे १.३१ टक्के आहे. या आजारातून एक कोटी पाच लाख ७३ हजार रुग्ण बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७.२६ टक्के आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्युदरातही घट होऊन तो १.४३ टक्के झाला आहे. देशभरात लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या २६ दिवसांत ७० लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. हा आकडा गाठायला अमेरिकेला २७ दिवस, तर ब्रिटनला ४८ दिवस लागले होते.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कोरोनाचे १२,९२३ रुग्ण आढळून आले असून, ११,७६४ जण बरे झाले. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,०८,७१,२९४ असून, त्यापैकी १,०५,७३,३७२ जण बरे झाले आहेत. गुरुवारी या संसर्गामुळे १०८ जण मरण पावले आहेत व बळींची एकूण संख्या १,५५,३६० झाली आहे.
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १,४२,५६२
जगभरात दहा कोटी ७८ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील सात कोटी ९८ लाख रुग्ण बरे झाले आहेत. दोन कोटी ५४ लाख उपचाराधीन रुग्ण आहेत.
अमेरिकेमध्ये दोन कोटी ७८ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील एक कोटी ७८ लाख कोरोना रुग्ण बरे झाले व ९५ लाख ८६ हजार जणांवर उपचार सुरू आहेत.