Corona Vaccination: कोरोना लसीचा दुसरा डोस घेताच प्रकृती बिघडली; घरी परतताना रस्त्यात कोसळून महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:28 PM2021-07-05T21:28:34+5:302021-07-05T21:31:25+5:30
Corona Vaccination: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप
गुना: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिकाधिक लोकसंख्येचं लसीकरण करून तिसरी लाट थोपवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मध्य प्रदेशच्या गुनामध्ये कोरोना लसीकरणादरम्यान एक चिंताजनक प्रकार घडला. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेऊन घरी परतणाऱ्या एका ८३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
शांतीबाई नावाच्या एका वृद्ध महिलेला अंगणवाडी कार्यकर्तेनं लसीकरण केंद्रावर आणलं होतं. नर्सनं सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी शांतीबाईंना लस देण्यात आली. त्यानंतर काही वेळ त्यांनी लसीकरण केंद्रात आराम केला. थोड्या वेळानं त्या केंद्रावरून घरी येण्यासाठी निघाल्या. थोड्या वेळानं मुलगा घनश्यामला शांतीबाई रस्त्यावर बेशुद्धावस्थेत सापडल्या. मुलानं त्यांना घेऊन लसीकरण केंद्रावर धाव घेतली. त्यानंतर त्यानं जिल्हा रुग्णालय गाठलं. तिथे शांतीबाईंना मृत घोषित करण्यात आलं.
अंगणवाडी कर्मचाऱ्यानं आईला अर्धवट रस्त्यात सोडल्यानं हा प्रकार घडल्याचा आरोप घनश्याम यांनी केला. तर शांतीबाई कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर स्वत: लसीकरण केंद्रावरून घराच्या दिशेनं निघाल्याचा दावा अंगणवाडी कर्मचाऱ्यानं केला.
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून व्हिसेरा तपासणी अहवाल आल्यानंतर महिलेच्या मृत्यूचं कारण समोर येईल, अशी माहिती डॉ. पी. बुनकर यांनी दिली. तीन डॉक्टरांच्या पॅनलनं महिलेचं शवविच्छेदन केलं आहे. महिलेचा मृत्यू लसीकरणामुळे झाल्याचं प्राथमिक अहवालातून तरी सिद्ध झालं नसल्याचं बुनकर यांनी सांगितलं.