बेजबाबदारपणाचा कळस! अनेकांना एक डोस मिळेना; इथे एकाच व्यक्तीला दिले चार डोस अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 11:28 AM2021-08-02T11:28:43+5:302021-08-02T11:31:22+5:30
Corona Vaccination: अनेक ठिकाणी एक डोस मिळत नसताना एकाच व्यक्तीला चार डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार
आरा: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा ५० हजारांच्या खाली आला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरण अभियानाला वेग देण्याची गरज आहे. मात्र अनेक ठिकाणी नागरिकांना लस मिळत नसल्याचं दिसत आहे. लसीसाठी स्लॉट न मिळालेल्या, दुसरा डोस वेळेवर न मिळालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. एका बाजूला लसींचा तुटवडा जाणवत असताना बिहारच्या भोजपूरमध्ये वेगळाच प्रकार घडला आहे.
भोजपूर जिल्ह्यातल्या एका वृद्धाला कोरोना लसीचे एक-दोन नव्हे, तर चार डोस देण्यात आले आहेत. हा प्रकार समोर येताच आरोग्य विभागात एकच खळबळ माजली. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कॉलोडीहरी गावात वास्तव्यास असलेल्या ७६ वर्षीय रामदुलार सिंह यांना कोरोना लसीचे चार डोस देण्यात आले आहेत. आपल्याला कोविशील्डचे ४ डोस देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. आरोग्य विभागानं अद्यापपर्यंत याबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही. चौकशी केल्यानंतर माहिती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
७६ वर्षांच्या रामदुलार सिंह यांना २३ फेब्रुवारीला आमहरुआा आरोग्य केंद्रात पहिला डोस देण्यात आला. तर दुसरा डोस १८ एप्रिलला देण्यात आला. सहार प्राथमिक आरोग्य केंद्रात सिंह यांना २३ मार्चला कोविशील्डचा पहिला, तर १६ जूनला दुसरा डोस दिला गेला. सिंह यांनीदेखील त्यांना चार डोस देण्यात आल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती सहार प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य व्यवस्थापक संजीव कुमार यांनी दिली. तांत्रिक त्रुटीमुळे असा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं.