Corona Vaccination: नाकावाटे लस... कितपत परिणामकारक?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 06:32 AM2022-01-31T06:32:59+5:302022-01-31T06:33:30+5:30
Corona Vaccination India: औषध महानियंत्रकांनी अलीकडेच कोव्हॅक्सिन लसीचे निर्माते असलेल्या भारत बायोटेक कंपनीला नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीच्या बूस्टर डोसची चाचणी करण्यासाठी संमती दिली. दोन टप्प्यांतील या चाचण्या शेकडो स्वयंसेवकांवर केल्या जाणार आहेत.
औषध महानियंत्रकांनी अलीकडेच कोव्हॅक्सिन लसीचे निर्माते असलेल्या भारत बायोटेक कंपनीला नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीच्या बूस्टर डोसची चाचणी करण्यासाठी संमती दिली. दोन टप्प्यांतील या चाचण्या शेकडो स्वयंसेवकांवर केल्या जाणार आहेत. त्यावरून बूस्टर डोसची परिणामकारकता अभ्यासता येणार आहे.
नाकावाटे दिली जाणारी लस म्हणजे काय?
बरेचदा लसी या इंजेक्शन त्वचेवर टोचून शरीरात सोडल्या जातात. लहान मुलांना तोंडावाटे लसी दिल्या जातात. नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसी दुर्मीळ असून त्या नाकात फवारल्या जातात. कोरोनासह अनेक विषाणू नाकावाटे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे विषाणूंचा प्रवेशद्वारावरच नायनाट करण्यासाठी लसीचा हा प्रकार विकसित केला गेला आहे.
लसीचे महत्त्व काय?
- नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसींमुळे व्यापक प्रमाणात करण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेतील अडचणी दूर होतात.
- सुई आणि सीरिंजचा वापर नसल्याने लसीकरणाचा खर्च कमी होतो.
- इंजेक्शनद्वारे लस देण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज भासते. त्यांच्या प्रशिक्षणावर खर्च होतो.
- नाकावाटे लस देणे तुलनेने सोपे असते. त्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळे प्रशिक्षण देण्याची गरज भासत नाही.
- या कारणांमुळे नाकावाटी दिली जाणारी लस महत्त्वाची ठरते.
लस कसे काम करते?
- नाकावाटे दिली जाणारी लस रक्तात प्रतिसादाची निर्मिती करतात.
- रक्तातील पेशी लसीतील अँटिबॉडीजचे मंथन करतात. लसीमुळे तयार झालेल्या या अँटिबॉडीज विषाणूला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखतात.
- नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचे डोस नाकातील श्लेष्मावरणात टिकाव धरतात. त्या ठिकाणच्या रक्तपेशी आयजीए नामक अँटिबॉडीचा दुसरा प्रकार तयार करतात.
- या अँटिबॉडी नाकावाटे श्वसनमार्गात येणाऱ्या कोणत्याही विषाणूचा त्या ठिकाणीच नायनाट करतात.
- नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीची परिणामकारकता १९६०च्या दशकात निदर्शनास आली होती. पोलिओ डोस नाकावाटे दिला जात होता.