Corona Vaccination: स्लो व्हॅक्सिनेशननं टेंशन वाढवलं! केंद्रानं बोलावली 11 मुख्यमंत्र्यांची बैठक, महाराष्ट्राचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 05:50 PM2021-10-31T17:50:01+5:302021-10-31T17:50:27+5:30
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, मांडविया यांनी देशभरात लसीकरणाला चालना देण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक केली होती. जेणेकरून नोव्हेंबर अखेरपर्यंत किमान पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण केले जाऊ शकेल.
नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि भारती पवार यांच्या उपस्थितीत, किमान ११ राज्यांची लसीकरण क्षमता वाढविण्यासंदर्भात तपशीलवार चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात येईल. यात ज्यांची सध्याची संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे, अशा राज्यांचा समावेश असेल. तीन तारखेला दुपारी १२ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने होणाऱ्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत 11 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 40 हून अधिक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित राहतील.
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, मांडविया यांनी देशभरात लसीकरणाला चालना देण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक केली होती. जेणेकरून नोव्हेंबर अखेरपर्यंत किमान पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण केले जाऊ शकेल. केंद्र सरकारने 2 नोव्हेंबरपासून घरो-घरी लसीकरण मोहीम सुरू करण्यासंदर्भातही भाष्य केले आहे.
PM मोदी “घरो-घरी लसीकरण” अभियानाला दाखवणार हिरवा झेंडा -
पंतप्रधान मोदी धनत्रयोदशीला म्हणजेच धन्वंतरी जयंतीला अधिकृतपणे घरोघरी लसीकरण मोहिमेला हिरवा झेंडा दाखवतील, या मोहीमेला केंद्राने "हर घर दस्तक" असे नाव दिले आहे. याशिवाय, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, नागालँड, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल सारखी अनेक राज्ये पहल्या आणि दुसऱ्या डोसच्या बाबतीत राष्ट्रीय सरासरीपेक्षा मागे असल्याचे केंद्राच्या निदर्शनास आले आहे.