Corona Vaccination: गुड न्यूज! मार्चपासून १२-१५ वयोगटातील मुलांनाही लस मिळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 06:07 PM2022-01-17T18:07:04+5:302022-01-17T18:07:20+5:30
कोविन पोर्टलनुसार, १५-१८ वयोगटातील ३ कोटी ४५ लाख ३५ हजाराहून जास्त मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
नवी दिल्ली – कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. भारतातही कोट्यवधी लोकांचं लसीकरण झालं आहे. अलीकडेच देशात लहान मुलांनाही लसीकरण सुरु झालं. त्यात १५ वर्षावरील मुलांना लस देण्यात येत होती. परंतु आता देशात फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्यापासून १२ वर्षावरील मुलांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.
कोरोना लसीकरणावरील राष्ट्रीय तंत्रज्ञान सल्लागार समितीचे प्रमुख एन. के अरोडा यांनी ही माहिती दिली आहे. NTGAI नं जानेवारीअखेरपर्यंत १५ ते १८ वयोगटातील सर्व ७.४ कोटी मुलांना लसीचा पहिला डोस देण्याचा अंदाज वर्तवला आहे. फेब्रुवारीत या मुलांना लसीचा दुसरा डोस दिला जाऊ शकतो. त्यानंतर मार्चच्या सुरुवातीला १२ ते १५ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात येईल अशी शक्यता अरोडा यांनी सांगितली आहे.
३ जानेवारीपासून १५ वर्षावरील मुलांचं लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत ५० लाखांहून अधिक मुलांनी लसीचा पहिला डोस मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन केले होते. पहिल्याच दिवशी ४० लाखाहून जास्त मुलांना कोविड १९ लसीचा पहिला डोस मिळाला होता. त्यानंतर पुढील १६ दिवसांत ३.३८ कोटी मुलांना लसीचा डोस मिळाला. २५ डिसेंबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड लसीकरण अभियानात १५ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करत असल्याची घोषणा केली होती. त्या वयोगटातील मुलामुलींसाठी भारत बायोटेकने बनवलेली कोव्हॅक्सिन दिली जात आहे.
२०२२ च्या सुरुवातीलाच १५-१८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार, १५-१८ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन दिली जात आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस २८ दिवसांनी दिला जातो. देशात वयस्क लोकांना कोव्हॅक्सिनशिवाय कोविशील्ड, स्पुतनिक या लसीही देण्यात आल्या आहेत. कोविन पोर्टलनुसार, १५-१८ वयोगटातील ३ कोटी ४५ लाख ३५ हजाराहून जास्त मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ज्या वेगाने ही लसीकरण मोहिम हाती घेतलंय ते पाहता फेब्रुवारी अखेरपर्यंत या वयोगटातील सर्व मुलांचे लसीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर १२ ते १५ वयोगटातील मुलांचं लसीकरण केले जाऊ शकते अशी माहिती आरोग्य मंत्रालय आणि NTAGI सूत्रांनी दिली आहे.