Corona Vaccination: एकदा घेतली की अनेक वर्षे संरक्षण; गेमचेंजर लस लवकरच भारतात येणार; आजच मोठा निर्णय अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 01:32 PM2021-06-29T13:32:46+5:302021-06-29T13:35:24+5:30
Corona Vaccination: डीसीजीआय आजच महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. गेल्या दीड महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घसरण सुरू आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून देशात लवकरच चौथी लस उपलब्ध होणार आहे. याबद्दलचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे.
भारतीय औषध महानियंत्रकांकडून (डीसीजीआय) मॉडर्ना लसीला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. याबद्दलचा निर्णय आजच होऊ शकतो अशी माहिती एएनआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. मॉडर्ना लसीची आयात करण्याची परवानगी सिप्ला कंपनीला लवकरच दिली जाऊ शकते, असं वृत्त एएनआयनं दिलं आहे. याआधी अशाच प्रकारची परवानगी डॉ. रेड्डीज लॅबला देण्यात आली होती. त्यानंतर रशियात तयार झालेली स्पुटनिक व्ही लस भारतात आली. भारतात आलेली ती पहिली परदेशी लस ठरली. आता यानंतर मॉडर्ना दुसरी लस ठरू शकते.
DCGI (Drug Controller General of India) may consider Cipla to import Moderna's #COVID19 vaccine shortly. Decision on approval for the same is expected today itself: Sources
— ANI (@ANI) June 29, 2021
कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट समोर येत असताना आणि त्यामुळे चिंतेत भर पडत असताना मॉडर्ना लसीबद्दल सकारात्मक माहिती पुढे आली आहे. mRNA तंत्रावर आधारित मॉडर्ना लस कोरोना विषाणूविरोधात आयुष्यभर संरक्षण देऊ शकते. ही लस घेतल्यानंतर कोरोना विषाणूविरोधात अतिशय मजबूत रोगप्रतिकाशक्ती तयार होते अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे.
कोरोना विषाणूच्या दोन व्हेरिएंटविरोधात मॉडर्ना लसीची चाचणी घेण्यात आली. त्या दोन्ही व्हेरिएंटविरुद्ध मॉडर्ना लस प्रभावी ठरली. कोरोना लस टोचण्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरात मुबलक प्रमाणात अँटीबॉडी तयार झाल्या. त्यामुळे मॉडर्ना लस घेणाऱ्या व्यक्तींना कोरोनापासून अनेक वर्षे किंवा आजीवन संरक्षण मिळू शकतं. याशिवाय ही लस घेणाऱ्यांना बूस्टर डोस घेण्याचीदेखील गरज भासणार नाही.