Corona Vaccination : लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्यांना दिल्लीतील एम्समध्ये प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 05:54 AM2021-06-07T05:54:57+5:302021-06-07T05:55:18+5:30

Corona Vaccination : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता नाही, असा दावा डॉ. संजय राय यांनी केला.

Corona Vaccination: Covacaine vaccine tests for children started at AIIMS, Delhi | Corona Vaccination : लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्यांना दिल्लीतील एम्समध्ये प्रारंभ

Corona Vaccination : लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्यांना दिल्लीतील एम्समध्ये प्रारंभ

googlenewsNext

- हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : फायझरने लहान मुलांसाठी कोरोना लस शोधली असली तरी भारतामध्ये २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांकरिता कोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरू झाल्या आहेत. एम्समधील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संजय राय यांच्या नेतृत्वाखाली या चाचण्या करण्यात येत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता नाही, असा दावा डॉ. संजय राय यांनी केला.
भारत बायोटेक ही कंपनीने तयार केलेली कोव्हॅक्सिन लस १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना आधीपासूनच देण्यात येत आहे. डॉ. संजय राय यांनी लोकमतला सांगितले की, लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचण्या आम्ही येत्या तीन महिन्यांत पूर्ण करणार आहोत. लहान मुलांकरिता कोव्हॅ्रक्सिन लसीच्या मानवी चाचण्या करण्यास औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला गेल्या महिन्यात परवानगी दिली होती. भारत बायोटेक ५६८ मुलांवर या लसीच्या चाचण्या सध्या करत आहे. त्या यशस्वी झाल्यास ही लहान मुलांसाठी असलेली पहिली स्वदेशी लस ठरणार आहे. तसेच झायडस कॅडिला व बायोलॉजिकल ई या कंपन्यादेखील १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लस बनवत असून, तिच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. 
डॉ. संजय राय यांनी सांगितले की, लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन व पालकांना विश्वासात घेऊन या चाचण्या सुरू आहेत. याआधी १८ वर्षे वयापुढील लोकांसाठी बनविलेल्या कोव्हॅक्सिन या पहिल्या स्वदेशी कोरोना लसीच्या चाचण्या डॉ. संजय राय यांच्या नेतृत्वाखालीच पार पाडण्यात आल्या होत्या. 
कोरोना साथीच्या आणखी काही लाटा येऊ शकतात. देशामध्ये कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेमध्ये प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत संसर्ग झालेल्या लहान मुलांची संख्या पाहता मुलांना तिसऱ्या लाटेपासून मोठा धोका आहे असे म्हणता येणार नाही, असे मत डॉ. गगनदीप कांग यांच्यासह काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

विषाणू, संसर्गजन्य रोगांच्या तज्ज्ञांचेच मत महत्त्वाचे 
- एम्समधील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संजय राय म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत विशेषत: लहान मुलांना संसर्गाचा मोठा धोका आहे, असा काही स्वयंघोषित तज्ज्ञ गाजावाजा करून भीती निर्माण करत आहेत. मात्र तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा मोठा धोका असल्याचा निष्कर्ष अद्याप कोणत्याही अभ्यासातून काढण्यात आलेला नाही. 

- अशा संवेदनशील विषयात सार्वजनिक आरोग्य या विषयाचे तज्ज्ञ, विषाणूतज्ज्ञ व संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ यांचेच मत प्रमाण मानले पाहिजे.

Web Title: Corona Vaccination: Covacaine vaccine tests for children started at AIIMS, Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.