Corona Vaccination: मोठी बातमी! भारतात २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी Covaxin ला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 01:24 PM2021-10-12T13:24:39+5:302021-10-12T13:50:56+5:30
Vaccination for child in India DCGI Approval: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील लहान मुलांबाबत मोठा निर्णय घेत त्यांच्यासाठी लसीकरणाचा मार्ग मोकळा केला आहे.
नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या लहान मुलांच्या लसीला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता २ वर्षावरील मुलांना कोरोनाची लस मिळणार आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक पालकांना दिलासा मिळणार आहे. DCGI नं कोव्हॅक्सिनला दिलेल्या परवानगीनंतर आता देशभरात लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
अमेरिका, सिंगापूर यांच्यासह जगभरातील २० देशांनी यापूर्वीच लहान मुलांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात केली आहे. भारतात कोव्हॅक्सिन लसीची ३ टप्प्यात चाचणी घेण्यात आली. सप्टेंबरपर्यंत ही चाचणी पूर्ण होऊन आशादायक चित्र पुढे आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने २ वर्षावरील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस देण्यास मंजुरी दिली आहे.
लहान मुलांना लस देणारा ‘हा’ पहिला देश ठरला
जगभरात आलेल्या कोरोना संकटामुळे अनेक जण दहशतीच्या सावटाखाली जगत होते. यातच कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. प्रत्येक देश त्यांच्याकडील लोकसंख्येला कोरोनापासून वाचवण्यासाठी लसीकरण करत होते. यात क्यूबा(Cuba) या देशाने २ वर्षावरील मुलांनाही कोरोना लस दिली होती. २ वर्षाच्या मुलांना कोरोना लस देणारा हा जगातील पहिला देश ठरला.
नागपूरात घेतली होती लहान मुलांवर चाचणी
भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीची मुलांवरील मानवी चाचणी नागपुरात घेण्यात आली होती. २ ते १८ वयोगटांतील जवळपास १७५ मुलांवर ही चाचणी झाली. कोव्हॅक्सिन लसीची ही चाचणी २ ते ६, ७ ते १२ आणि १३ ते १८ या तीन वयोगटांत विभागणी करून घेण्यात आली होती. दिल्लीच्या एम्समध्येही लहान मुलांवर चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर या चाचणीचे रिपोर्ट आरोग्य मंत्रालयाला पाठवण्यात आले. त्यानंतर आता या लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.
सप्टेंबरमध्ये चाचणी पूर्ण
भारत बायोटेक(Bharat Biotech) च्या कोव्हॅक्सिनची सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची चाचणी पूर्ण झाली होती. ऑक्टोबरमध्ये कोव्हॅक्सिनच्या उत्पादनाची मर्यादा वाढवणार असल्याचंही कंपनीने म्हटलं होतं.