Corona Vaccination: डेल्टा लाटेत काेविशिल्डचे भारतीयांना भक्कम संरक्षण, लॅंसेटच्या अभ्यासातील माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 10:32 AM2021-12-01T10:32:29+5:302021-12-01T10:32:56+5:30
Corona Vaccination in India: भारतासह जगभरात काेराेनाच्या डेल्टा व्हेरिएंटने हाहाकार माजवला हाेता. अशावेळी काेविशिल्ड या कारेाेना प्रतिबंधक लसीने भारतीयांना भक्कम संरक्षण दिल्याचे आढळून आले आहे.
नवी दिल्ली : भारतासह जगभरात काेराेनाच्या डेल्टा व्हेरिएंटने हाहाकार माजवला हाेता. अशावेळी काेविशिल्ड या कारेाेना प्रतिबंधक लसीने भारतीयांना भक्कम संरक्षण दिल्याचे आढळून आले आहे. लॅंसेटने केलेल्या अभ्यासातून ही माहिती मिळाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये भारतात डेल्टा व्हेरिएंटच्या हल्ल्यावर काेविशिल्डच्या प्रभावशीलतेचा आढावा घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला हाेता. लॅंसेटच्या माहितीनुसार, काेविशिल्डचे दाेन्ही डाेस घेणाऱ्यांमध्ये ६३ टक्के लस प्रभावी ठरली, तर मध्यम ते गंभीर आजारांच्या कालावधीत लस ८१ टक्के प्रभावी आढळली.
काेविशिल्ड किती प्रभावी?
सध्या जगावर ओमायक्राॅन व्हेरिएंटचा धाेका निर्माण झाला आहे. त्यावर काेविशिल्ड किती प्रभावी ठरेल, हे २-३ आठवड्यांमध्ये कळेल, असे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितले. ओमायक्राॅनचा धाेका पाहता बूस्टर डाेस देणे शक्य आहे. मात्र, सध्या सर्वांना लसीचे दाेन्ही डाेस देण्यावर सरकारने भर दिला पाहिजे, असे पूनावाला म्हणाले.
‘व्हॅक्सिन’ हा या वर्षीचा मेरियम-वेबस्टरचा शब्द
वॉशिंग्टन : अमेरिकन शब्दकोश मेरियम-वेबस्टरने वर्ष २०२१ चा ‘व्हॅक्सिन’ हा शब्द असल्याचे सोमवारी जाहीर केले. संपूर्ण जग दोन वर्षे कोविड-१९ महामारीशी लढत असताना, ‘व्हॅक्सिन’ या शब्दातून आशा आणि लसीकरणामुळे तीव्र असे तट पडल्याचे दिसले. वर्ष २०२१ मध्ये ‘लस’ हा शब्द एका औषधापेक्षाही जास्त काही आहे. लस या शब्दाची व्याख्या शोधण्यात २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये ६०१ पट वाढ झाली.