Corona Vaccination: पहिला डोस कोविशील्डचा, दुसरा कोवॅक्सिनचा; आक्षेप घेताच तिसरा डोसही दिला; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:55 IST2021-07-20T14:52:40+5:302021-07-20T14:55:44+5:30
Corona Vaccination: लसीकरण केंद्रावर सावळागोंधळ; ज्येष्ठाला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस

Corona Vaccination: पहिला डोस कोविशील्डचा, दुसरा कोवॅक्सिनचा; आक्षेप घेताच तिसरा डोसही दिला; अन् मग...
भोपाळ: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र काही ठिकाणी लसीकरण मोहिमेत सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशातल्या मुरैनामध्ये असाच प्रकार पाहायला मिळाला आहे. एका व्यक्तीला कोरोना लसीचे तीन डोस देण्यात आले आहेत. यातले दोन डोस प्रत्यक्षात देण्यात आले आहेत. तर तिसरा डोस कागदावरच देण्यात आला आहे.
मुरैनात एका ज्येष्ठ नागरिकाला पहिला डोस कोविशील्डचा देण्यात आला. त्यानंतर दुसरा डोस कोवॅक्सिनचा दिला गेला. ज्येष्ठ नागरिकानं आरोग्य कर्मचाऱ्यांकडे याबद्दल आक्षेप नोंदवला. त्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कागदोपत्री तिसऱ्या डोसची नोंदणी केली. कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकाला दोन्ही डोस एकाच कंपनीचे देण्यात आल्याचं प्रमाणपत्र दिलं आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांना दोन डोस वेगवेगळ्या कंपन्यांचे देण्यात आल्यानं त्यांची प्रकृती बिघडली आहे.
मुरैना शहरातील रामनगरमध्ये ६० वर्षांचे जयप्रकाश अग्रवाल वास्तव्यास आहेत. कृष्णा गार्डनमधील लसीकरण केंद्रावर त्यांनी ४ एप्रिलला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. त्यांना कोविशील्डचा डोस देण्यात आला. दुसऱ्या डोससाठी त्यांना ६ जूनला बोलावण्यात आलं. जयप्रकाश यांनी ४ एप्रिलला त्यांना देण्यात आलेलं प्रमाणपत्र नर्सला दाखवलं. नर्सनं त्यांना कोवॅक्सिनचा डोस दिला. तशी माहिती त्यांना देण्यात आली. मात्र या डोसचं प्रमाणपत्र देण्यात आलं नाही.
जयप्रकाश अग्रवाल घरी परतल्यावर त्यांच्या डोक्याचा निम्मा भाग दुखू लागला. याशिवाय त्यांना तापही आला. १० जुलैला आरोग्य विभागानं त्यांना बोलावलं आणि लसीकरणाचं प्रमाणपत्र दिलं. १० जुलैला कोविशील्डचा दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती प्रमाणपत्रावर होती. मात्र प्रत्यक्षात १० जुलैला त्यांना डोसच दिला गेला नव्हता. त्यांना ६ जुलैला कोवॅक्सिनचा डोस देण्यात आला होता.