corona vaccination : लसीच्या दोन मात्रांतील अंतराने प्रतिकारशक्ती वाढते
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 05:05 AM2021-04-01T05:05:52+5:302021-04-01T05:06:43+5:30
corona vaccination : पत्रकार करण थापर यांनी गगनदीप कांग यांची कोरोना लसीबाबत घेतलेली मुलाखत. कांग या वेल्लोर येथे ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये गॅस्ट्रोइन्टेस्टिनल सायन्सच्या प्रोफेसर आहेत.
नवी दिल्ली : कोरोनावरील लसीची पहिली आणि दुसरी मात्रा यांच्यात किती दिवसांचे अंतर हवे? भारत सरकार म्हणते की २८ दिवस, तर जागतिक आरोग्य संघटनेने ८ ते १२ आठवड्यांच्या अंतराची शिफारस केली आहे. ब्रिटिश सरकारने ११ ते १२ दशलक्ष लोकांना ॲस्ट्राझेनेका लस दिली आहे व ते हेच अंतर ठेवत आहेत. भारतात कोविशिल्ड लस घेतलेल्यांचा संभ्रम झाला आहे.
दुसरी मात्रा २८ दिवसांनी घ्यावी की ८ ते १२ आठवड्यांनी?
उत्तर : भारत सरकारने ४ ते ६ आठवड्यांची, तर हूने दीर्घ दिवसांच्या अंतराची शिफारस केली आहे. लसीमुळे मिळणारी प्रतिकारशक्ती आणि सामर्थ्य याच्या उपलब्ध माहितीने लसीच्या दोन मात्रांतील दीर्घ अंतराला पाठिंबा दिला आहे.
तुम्ही दोन मात्रांत दीर्घ अंतराची शिफारस करता. त्यातून प्रतिकारशक्ती वाढते असे म्हणता, असा याचा अर्थ घ्यायचा का?
उत्तर : लसीला जी रेग्युलेटरी ॲप्रुव्हल मिळाली त्यानुसार कमी दिवसांच्या अंतराची सरकारची शिफारस आहे.
तुम्ही स्वत: कोविशिल्ड लस घेतली आहे. २८ दिवसांची शिफारस असताना तुम्ही ८ ते १२ आठवड्यांनी दुसरी मात्रा घेणार का?
उत्तर : मी दीर्घ अंतराने दुसरी मात्रा घेईन.
व्हॉटस्ॲपवर अशी चर्चा आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर काही जणांना बाधा झाली?
उत्तर : कोणतीही लस तुम्हाला पूर्ण संरक्षण देत नाही. लस घेतल्यानंतरही ती व्यक्ती आजारी पडू शकते, तिला कोरोनाची बाधा होऊ शकते. लस ५०, ७० किंवा ९० टक्के परिणामकारक आहे, असे आपण म्हणतो. लस घेतल्यानंतरही काही लोकांना कोरोनाची बाधा होते. हे आपल्याला अपेक्षित असले पाहिजे.
लस घेतल्यानंतरही काही लोकांना बाधा झाली आहे...
उत्तर : लोकसंख्येचा विचार करून लसीच्या परिणामकारकतेचा विचार केला पाहिजे. वैयक्तिक पातळीवर त्याचे लसीने संरक्षण होत आहे. सध्या तरी आमच्याकडे कोरोनापासून वाचण्यासाठी दुसरा उपाय नाही.
कोविशिल्ड लसीची दुसरी मात्रा घेताना हूने जी ८ ते १२ आठवड्यांची आणि कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा घेताना २८ दिवसांच्या अंतराची शिफारस केली आहे.
उत्तर : कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या मात्रेत जास्त अंतर ठेवल्यावर प्रतिकारशक्ती वाढते, अशी काही माहिती सध्या उपलब्ध नाही.
(‘वायर’वरून साभार)