Corona Vaccination: दरराेज एक काेटी डाेसचे उद्दिष्ट; ऑगस्टपासून ३० काेटी डाेस उपलब्ध हाेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 06:29 AM2021-06-01T06:29:30+5:302021-06-01T06:30:36+5:30
ऑगस्टपर्यंत दरमहा २० ते २५ काेटी डाेसचे उत्पादन हाेणार असून, आयात आणि इतर युनिटमधून आणखी पाच ते सहा काेटी डाेस उपलब्ध हाेणार आहेत.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने या वर्षाअखेरपर्यंत सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य समाेर ठेवले आहे. त्यासाठी लस उत्पादन वाढविण्याचे जाेरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. ऑगस्टपर्यंत दरमहा २० ते २५ काेटी डाेसचे उत्पादन हाेणार असून, आयात आणि इतर युनिटमधून आणखी पाच ते सहा काेटी डाेस उपलब्ध हाेणार आहेत. यासाेबतच आता दाेन वेगवेगळ्या लसींचे डाेस देण्याच्या चाचणीचाही सरकार विचार करीत असल्याची माहिती राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समूहाचे अध्यक्ष डाॅ. एन. के. अराेरा यांनी दिली.
उत्पादन कमी असल्यामुळे ते कसे पूर्ण हाेणार, हा प्रश्न हाेता. मात्र, त्यासाठी सुमारे २१८ काेटी डाेस उपलब्ध हाेणार असल्याचे सरकारने काही दिवसांपूर्वी सांगितले हाेते. हे लक्ष्य गाठायचे असल्यास दरमहा ३० ते ३२ काेटी डाेस उपलब्ध हाेणे आवश्यक आहे. ते कसे उपलब्ध हाेतील, यासाठी सरकारसमाेर एक राेडमॅप आला आहे.
असा आहे राेडमॅप
‘सिरम इन्स्टिट्यूट‘ने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यापासून ‘कोव्हिशिल्ड‘ या लसीचे दरमहा १० ते १२ काेटी डाेसचे उत्पादन हाेणार आहे.
जुलैच्या अखेरपर्यंत काेव्हॅक्सिनचेही तेवढेच उत्पादन हाेणार आहे.
‘स्पुतनिक-व्ही‘चे आयात केलेले आणि देशांतर्गत उत्पादन हाेणारे मिळून आणखी पाच ते सहा काेटी डाेस उपलब्ध हाेणार आहेत.
सरकारकडून आणखी काही परदेशी लसींना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
दरराेज एक काेटी डाेस देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
चाचणी लवकर
काेराेनावर मात करण्यात दाेन वेगवेगळ्या लसींचे डाेस प्रभावी ठरतात का, यावर संशाेधन सुरू आहे. भारतातही त्याच्या काही आठवड्यांमध्ये चाचण्या सुरू करण्यात येतील, असे संकेत डाॅ. एन. के. अराेरा यांनी दिले आहेत. हा प्रयाेग यशस्वी झाल्यास दाेन वेगवेगळ्या
कंपन्यांचे डाेस देण्यात येतील.