Corona vaccination: आतापर्यंत किती खासदारांनी घेतली नाही कोरोनावरील लस, धक्कादायक माहिती आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 06:45 PM2021-06-30T18:45:07+5:302021-06-30T18:46:12+5:30
Corona vaccination in India: सर्वसामान्यांना लस घेण्यासाठी आवाहन करणाऱ्या संसदेतील खासदारांपैकी किती जणांनी आतापर्यंत कोरोनाविरोधातील लस घेतली आहे असा प्रश्न आता विचारला जात आहे.
नवी दिल्ली - भारतात कोरोनाविरोधातील लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे. (Corona vaccination) देशभरात आतापर्यंत ३२ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दरम्यान, सर्वसामान्यांना लस घेण्यासाठी आवाहन करणाऱ्या संसदेतील खासदारांपैकी किती जणांनी आतापर्यंत कोरोनाविरोधातील लस घेतली आहे असा प्रश्न आता विचारला जात आहे. ( How many MPs have not taken the corona vaccine so far? Shocking information came to the fore)
हा प्रश्न विचारण्यामागचे कारण म्हणजे १९ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. दरम्यान, अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही सभागृहामधील खासदारांनी कोरोनाविरोधातील लसीचे दोन डोस घ्यावेत, अशी राज्यसभा आणि लोकसभा सचिवालयाची अपेक्षा आहे.
दरम्यान, संसदेतील दोन्ही सभागृहांनी गोळा केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यसभेतील १७९ खासदारांनी कोरोनाविरोधातील लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर ३९ खासदारांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ९ खासदारांनी कोरोनावरील लसीचा एकही डोस घेतलेला नाही. इतर पाच खासदार कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांनी लस घेतलेली नाही. लोकसभेतील आकडेवारीनुसार आतापर्यंत ३२० खासदारांनी कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर १२४ खासदारांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संसदेतील एकूण ९६ खासदारांनी आतापर्यंत कोरोनावरील लसीचा एकही डोस घेतलेला नाही, मात्र खासदारांच्या लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात केली आहे. सुरुवातीला फ्रंटलाइन वर्कर्स आणि हेल्थकेअर वर्कर्सना लस दिली गेली. त्यानंतर केंद्र सरकारने १ मार्चपासून ६० वर्षांवरील आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या लोकांचे लसीकरण सुरू केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर मोदींनी कोरोनावरील लसीचा दुसरा डोस हा ८ एप्रिल रोजी घेतला होता. स्वत: मोदींनी कोरोनावरील लसीचे डोस घेण्याचे आवाहन मंत्री आणि खासदारांना केले होते.