Corona vaccination : पुढील महिन्यापासून भारत पुन्हा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसी पुरवणार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 07:44 PM2021-09-20T19:44:41+5:302021-09-20T19:48:20+5:30
Corona vaccination: कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारताने जगातील काही देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर बाहेरील देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबवण्यात आला होता.
नवी दिल्ली - कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारताने जगातील काही देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर बाहेरील देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबवण्यात आला होता. दरम्यान, आता पुढील महिन्यापासून भारत पुन्हा एकदा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसींचा पुरवठा करणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही घोषणा केली आहे. (India to supply corona vaccine to worldwide from next month: Health Minister)
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबतची घोषणा करताना आज सांगितले की, देशामध्ये कोरोना विषाणूविरोधातील सुरू असलेल्या लसीकरणाच्या अभियानांतर्गत आतापर्यंत ८१ कोटींहून अधिक व्यक्तींना लसीचे डोस देण्यात आले आहे. त्यांनी सांगितले दरम्यान, १० कोटी डोस तर केवळ ११ दिवसांत दिले गेले, अशी माहितीही त्यांनी दिली.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी पुढे सांगितले की, व्हॅक्सिन मैत्रींतर्गत भारत संपूर्ण जगाला मदत करणार आहे. तसेच चौथ्या तिमाहीमध्ये कोव्हॅक्समध्ये योगदान देणार आहे. आम्हाला पुढच्या महिन्यात कोरोनाविरोधी लसींचे ३० कोटींहून अधिक डोस मिळण्याची अपेक्षा आहे. लसींचे उत्पादन वाढणार आहे. याचं कारण म्हणजे जैविक ई आणि इतर कंपन्या आपल्या लसी बाजारात आणणार आहेत. कोव्हॅक्स एक जागतिक पाऊल आहे, त्याला औपचारिकपणे कोविड-१९ लसीची जागतिक पुरवठा सुविधा म्हणून ओळखले जाते. मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांना कोरोनावरील लसीचे डोस वेळेत मिळावे, हे सुनिश्चित करणे हे याचे लक्ष्य आहे.
यादरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने सांगितले की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-१९ लसींचे आतापर्यंत ७९.५८ कोटींहून अधिक डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. मंत्रालयाने सांगितले की, १५ अजून डोसचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांजवळ वापर करण्यासाठी लसीचे ५.४३ कोटी डोस उरलेले आहे.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींची उपलब्धता वाढवून लसीकरण अभियानाला गती देण्यात आली आहे. जेणेकरून त्याद्वारे चांगली योजना बनवता येईल. तसेच लसींच्या पुरवठ्याची साखळ सुव्यवस्थित करता येईल. राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानांतर्गत केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-१९ विरोधी लसी निशुल्कपणे उपलब्ध करून दिले जातील.