Corona vaccination : मोठी बातमी! भारताचे ऐतिहासिक यश, कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये गाठला १०० कोटींचा आकडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 10:09 AM2021-10-21T10:09:53+5:302021-10-21T12:07:14+5:30
Corona vaccination in India: देशासह जगभरामध्ये सुरू असलेल्या कोरोनाविरोधातील लढाईमध्ये भारताने आज ऐतिहासिक यश मिळवले आहे. भारताने आज कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये १०० कोटींचा आकडा गाठला आहे.
नवी दिल्ली - देशासह जगभरामध्ये सुरू असलेल्या कोरोनाविरोधातील लढाईमध्ये भारताने आज ऐतिहासिक यश मिळवले आहे. भारताने आज कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये १०० कोटींचा आकडा गाठला आहे. जानेवारी महिन्यामध्ये १६ तारखेपासून भारतात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला आरोग्य यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांपासून सुरू झालेल्या या लसीकरणामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व वयोगटांचा समावेश करण्यात आला. दरम्यानच्या काळात लसींची टंचाई, लसीबाबत पसरलेल्या अफवा, शंका अशा सर्व अडचणींवर मात करत भारतातील आरोग्य यंत्रणा, केंद्र आणि राज्य सरकारमधील नियोजनांच्या माध्यमातून भारताने १०० कोटी लसी देण्याचा ऐतिहासिक मैलाचा दगड भारताने गाठला आहे. (India achieves the landmark one billion COVID19 vaccinations mark)
India achieves the landmark one billion COVID19 vaccinations mark pic.twitter.com/g7DYqcvgjK
— ANI (@ANI) October 21, 2021
जानेवारी २०२० मध्ये भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने देशव्यापी लॉकडाऊनला सुरुवात झाली होती. दरम्यान, १६ जानेवारी २०२१ पासून देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यावेळी कोविड योद्धे असलेल्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. १ मार्चपासून ६० वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली होती. तर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्ती आणि १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले होते.
दरम्यान, कोरोनाच्या लसीबाबतच्या अफवा, शंका आणि लसींचा तुटवडा यामुळे या लसीकरण मोहिमेत अनेक अडथळे आले. मात्र या अडथळ्यांवर मात करत देशात लसीकरण मोहीम सुरू राहिली. देशातील कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी मुख्यत्वेकरून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा वापर केला गेला. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग वाढला. तसेच काही वेळा दिवसाला १ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रम नोंदवला गेला. दरम्यान, आज २१ ऑक्टोबर रोजी कोरोना लसीकरणामध्ये १०० कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा भारताने गाठला आहे.