Corona Vaccination : कोरोना लसीमुळे वंध्यत्व? अफवांवर आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 10:42 AM2021-06-22T10:42:20+5:302021-06-22T10:50:05+5:30
Corona Vaccination : कोरोना लसीकरणामुळे पुरुष व स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते अशी चिंता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त केली होती.
नवी दिल्ली : कोरोना लसीबाबत अनेक अफवा पसरल्या जात आहेत, ज्याचा परिणाम लसीकरणावरही दिसून येत आहे. अशीच एक अफवा चुकीची असल्याचे सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, की जे कोरोना लसीमुळे वंध्यत्वाला कारणीभूत ठरतील. त्यामुळे अशा परिस्थितीत अशा गोष्टींकडे लक्ष दिले जाऊ नये, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले. (corona vaccination infertility health ministry clarifies men or women)
कोरोना लसीकरणामुळे पुरुष व स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते अशी चिंता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त केली होती. यावर मंत्रालयाने म्हटले आहे की, अलिकडच्या काळात मीडिया रिपोर्ट्समध्ये फ्रंटलाइन वर्कर्स, हेल्थकेअर वर्कर्समध्ये अंधश्रद्धा आणि इतर गोष्टींबद्दलच्या चिंतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पोलिओ व इतर लसीकरण मोहिमेदरम्यान अशा गोष्टीही समोर आल्या होत्या.
कोरोना लसीमुळे वंध्यत्व येत नाही, सर्व लसींची यापूर्वीच सर्व प्रकारे चाचणी घेण्यात आली आहे. त्यांची सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी लसीकरणासंदर्भात राष्ट्रीय तज्ज्ञ समूहाने आवाहन केले होते की गर्भवती महिला, स्तनपान करणारी महिलांनाही लसीकरण आवश्यक आहे आणि ते मुलांच्या सुरक्षेसाठी देखील महत्वाचे आहे.
#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) June 21, 2021
𝐂𝐎𝐕𝐈𝐃𝟏𝟗 𝐕𝐚𝐜𝐜𝐢𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧: 𝐌𝐲𝐭𝐡𝐬 𝐕𝐬. 𝐅𝐚𝐜𝐭𝐬
To Read more : https://t.co/fu9WKwoVnepic.twitter.com/8X9F94Gyee
देशात सध्या सुरू असलेल्या मिशन लसीकरणात अनेक अडथळे येत आहेत. लसीची भीती बरीच ग्रामीण भागात पसरली आहे, काही जण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात अशा परिस्थितीत लसीबाबत चुकीची माहिती पसरवू नये म्हणून आवाहन केले जात आहे. सध्या देशात लसीकरण अभियान वेगाने सुरू आहे. सोमवारी देशात ८२ लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले, जे आतापर्यंतचा विक्रम आहे.
लसीकरणाचा विक्रम
सोमवारी सायंकाळपर्यंत देशभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. हे एका दिवसातील आजपर्यंतचे विक्रमी लसीकरण आहे. देशात १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर प्रथमच एकाच दिवशी इतक्या मोठय़ा प्रमाणावर लसीकरण करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत एकूण २८ कोटी ३३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले.
महाराष्ट्रात 15 मेपासून आतापर्यंत 7500 नमुने घेण्यात आले आहेत, त्यात डेल्टा प्लसची सुमारे 21 प्रकरणे आढळली. #coronavirus#DeltaVarianthttps://t.co/revHxvEiBZ
— Lokmat (@MiLOKMAT) June 22, 2021
Pfizer आणि Moderna लसीमुळे प्रजनन क्षमतेत घट होत नाही - स्टडी
गेल्या काही दिवसांपूर्वी फायझर, मॉडर्ना यांनी विकसित केलेली कोरोना लस घेतल्यास प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता एका संशोधनामुळे निर्माण झाली आहे. फायझर, मॉडर्ना या कोरोना लसीमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नसल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. 'जामा' या नियताकालिकेत प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, १८ ते ५० या वयोगटातील ४५ निरोगी व्यक्तींना या संशोधनात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांना फायजर-बायोएनटेक आणि मॉडर्नाच्या एमआरएनए कोविड लस देण्यात आली होती. या संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींना यापूर्वीदेखील प्रजननाबाबत कोणतीही समस्या नव्हती.