Corona Vaccination: लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो कशाला? माजी प्राध्यापकाची तक्रार; लस घेण्यास स्पष्ट नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 12:19 PM2021-04-29T12:19:33+5:302021-04-29T12:26:55+5:30
Corona Vaccination: जेएनयूच्या माजी प्राध्यापकाचं थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पत्र; लसीकरण प्रमाणपत्राबद्दल नाराजी व्यक्त
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यासोबतच लसीकरण मोहिमेला वेग देण्याचं कामही सुरू आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी प्राध्यापकांनी मात्र वेगळ्याच कारणामुळे कोरोना लस घेण्यास नकार दिला आहे. पंजाब विद्यापीठाचे अधिष्ठाता म्हणून काम केलेल्या चमनलाल यांनी यासंदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्र लिहिलं आहे.
राज्य कोरोना संकटात, तिजोरीवर मोठा भार; काँग्रेसनं घेतला महत्त्वाचा निर्णय
माझं वय आता जवळपास ७४ वर्षे आहे. मला कोरोना लसीची गरज आहे. मात्र माझे काही वैयक्तिक आणि सामाजिक आक्षेप आहेत. पंजाबचा (भारत) नागरिक म्हणून आणि जगाचा नागरिक म्हणून मी काही आक्षेप नोंदवू इच्छितो. या आक्षेपांमुळेच मी आतापर्यंत कोरोना लस घेतलेली नाही. मी आजही कोरोना लस घेण्यास उत्सुक नाही. कारण कोरोना लसीकरण केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोंचा लावण्यात आलेला आहे. हा फोटो प्रमाणपत्रावर अनिवार्य आहे, असं चमनलाल यांनी पत्रात नमूद केलं आहे.
जगातील इतर कोणत्याही देशात लसीकरण प्रमाणपत्रावर राजकीय नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही, याकडे चमनलाल यांनी लक्ष वेधलं आहे. 'कोरोना लसीकरण हे राष्ट्रीय अभियान आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर आरोग्य अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असायला हवी. मात्र भारतातील असहाय जनतेला सत्तेतील नेत्याचा फोटो असलेलं प्रमाणपत्र दिलं जात आहे. याचा मी निषेध करतो. सत्ताधारी पक्षाच्या धोरणांमुळे आणि बेजबाबदारपणामुळेच देशात कोरोना बळी गेले आहेत. देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सर्वस्वी केवळ देशातला सत्ताधारी पक्षच जबाबदार आहे,' अशा शब्दांत चमनलाल यांनी प्रमाणपत्रावरील फोटोबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.