Corona Vaccination: जबरदस्त! लसीकरण मोहीम वेग धरणार; दिग्गज कंपनी सिंगल डोस लस घेऊन भारतात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 11:27 AM2021-06-30T11:27:11+5:302021-06-30T11:28:47+5:30
Corona Vaccination: लवकरच आणखी एक परदेशी लस भारतात येणार
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी सध्या लसीकरण मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कालच भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) मॉडर्ना लस आयात करण्याची परवानगी दिली. या लसीच्या आपत्कालीन वापरासदेखील लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यानंतर आता जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
देशात लवकरच जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होईल. कोरोनावरील लसींचा वापर भारतात सुरू करायचा असल्यास आधी त्या लसींची भारतामध्ये चाचणी करणं गरजेचं होतं. मात्र आता अशी चाचणी बंधनकारक नाही. त्यामुळे जॉन्सन अँड जॉन्सन लवकरच त्यांची कोरोना प्रतिबंधात्मक लस भारतीय बाजारात आणणार आहे. त्यासाठी कंपनीची भारत सरकारसोबत चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे कोवॅक्सिन, कोविशील्डप्रमाणे जॉन्सन अँड जॉन्सन लसीचे दोन डोस घ्यावे लागणार नाहीत. या लसीचा केवळ एकच डोस घ्यावा लागेल.
भारतात कोरोना लस आणताना आधी त्या लसीची देशात चाचणी करणं अत्यावश्यक होतं. मात्र आता डीसीजीआयनं ती अट मागे घेतली आहे, अशी माहिती जॉन्सन अँड जॉन्सनचे प्रवक्ते यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं. 'आम्ही सध्या भारत सरकारसोबत संवाद साधत आहोत. भारताला सिंगल डोस लस जास्तीत जास्त कशी देता येईल, आमची क्षमता कशी वाढवता येईल, यादृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत,' अशी माहिती प्रवक्त्यांनी दिली.
मॉडर्ना लसीच्या आयातीला परवानगी
मॉडर्नाची कोविड-१९ वरील लस देशात मर्यादित आणि तातडीच्या वापरासाठी आयात करण्याची परवानगी मुंबईस्थित सिप्ला या औषध कंपनीला देशाच्या औषध नियंत्रकांनी (डीसीजीआय) दिली आहे, असं निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितलं. ‘मॉडर्नाचा अर्ज तिची भारतीय भागीदार सिप्लाकडून प्राप्त झाल्यानंतर मॉडर्नाच्या कोविड-१९ लसीला तातडीच्या मर्यादित वापरासाठी मंजुरी औषध नियंत्रकांनी दिली आहे. ही लस नजिकच्या भविष्यात आयात केली जाण्याची स्पष्ट शक्यता आहे, असं ते म्हणाले. कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या अधिकृत परवाना असलेल्या लसी असल्याचं पॉल म्हणाले.