Corona Vaccination: आधी कोविशील्डचा डोस, नंतर ५ मिनिटांनी कोवॅक्सीन टोचली; बेजबाबदारपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 12:19 PM2021-06-19T12:19:08+5:302021-06-19T12:19:37+5:30
बिहारची राजधानी पाटण्यातील धक्कादायक प्रकार; महिलेची प्रकृती खालावली
पाटणा: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा असल्यानं लसीकरण मोहीम थंडावली आहे. तर काही ठिकाणी लसीकरणादरम्यान कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर येत आहे. बिहारची राजधानी पाटण्यात एक गंभीर प्रकार घडला आहे.
कोरोना लस घेतल्यानंतर किती दिवसांनंतर मिळतं 'सुरक्षा कवच'?; जाणून घ्या महत्त्वाची माहिती
पाटण्यातील पुनपुन परिसरात वास्तव्यास असलेल्या सुनिला देवी बुधवारी कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गेल्या होत्या. मात्र केंद्रावर त्यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. सुनिला यांना अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरानं कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. विशेष म्हणजे दोन्ही डोस वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसींचे होते. सुनिला यांना पहिला डोस कोविशील्डचा, तर दुसरा डोस कोवॅक्सीनचा देण्यात आला.
Pfizer आणि Moderna लसीमुळे प्रजनन क्षमतेत घट होत नाही - स्टडी
अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरानं महिलेला दोन डोस देण्यात आले. त्याचा परिणाम थोड्याच वेळात तिच्या शरीरावर दिसू लागला. रात्रभर महिलेला ताप आला. मात्र तिच्या तपासणीसाठी डॉक्टर, नर्स यापैकी कोणीही आलं नाही. या घटनेमुळे लसीकरण केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
महिलेला अवघ्या ५ मिनिटांत दोन डोस देण्यात आल्याची चूक समोर येताच तिच्यावर २४ तास लक्षात ठेवण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र तिच्या देखरेखीसाठी लसीकरण केंद्रातून कोणीही आलं नाही. रात्री महिलेला अशक्तपणा जाणवू लागला. त्यावेळी तिच्या कुटुंबियांनी तिला ग्लुकोज दिलं. सुनिला यांच्यासोबत काहीतरी अघटित घडणार नाही, अशी भीती त्यांच्या कुटुंबियांना वाटत आहे. सुनिला यांच्या बाबतीत घडलेला प्रकार पाहून ग्रामस्थ धास्तावले आहेत.