शंभर कोटी डोसचा टप्पा उद्या होणार पूर्ण; केंद्र सरकार ऐतिहासिक क्षण मोठ्या प्रमाणावर साजरा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 06:43 AM2021-10-20T06:43:48+5:302021-10-20T06:44:04+5:30
ऐतिहासिक क्षण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा मोदी सरकारचा बेत
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : देशभरात राबविल्या जात असलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना लसीचे ९९ कोटी डोस देण्यात आले असून, गुरुवारी, २१ ऑक्टोबर रोजी भारत एक अब्ज डोसचा (१०० कोटी) टप्पा पार करणार आहे. एका ऐतिहासिक क्षण मोठ्याप्रमाणावर साजरा करण्याचा मोदी सरकारचा बेत आहे.
सणासुदीमुळे मागच्या आठवड्यात लसीकरणाचा मोहीम धीमी पडल्याने मागच्या आठवडाभरात फक्त १.३२ कोटी डोस देता आले. सोमवारपासून लसीकरणाला गती आली असून सोमवारी सायंकाळपर्यंत ८७.२३ कोटी डोसचा टप्पा गाठला. भारताने मंगळवारी पात्र लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या डोसचा टप्पा ९९ कोटी पार केला. मंगळवारी सांयकाळपर्यत ३९ लाख डोस देण्यात आले.
बुधवारी मोठा सण असल्याने लसीकरणासाठी अनेक लोक स्वत:हून न येण्याची शक्यता वाटते. त्यामुळे १०० कोटी डोसचे उद्दिष्ट गाठण्यात समस्या येऊ शकते. त्यामुळे १०० कोटी डोसचा पल्ला गुरुवारी गाठण्यासाठी आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी दिवसभरात बैठका घेण्यात व्यस्त होते. मागच्या संपूर्ण आठवडाभरात लसीकरणाची गती कशी धीमी पडल्याचे तक्त्यावरून दिसेल.
सोमवारपासून लसीकरणाने गती पकडली आहे
उत्तर प्रदेश (१२ कोटी) आणि महाराष्ट्राने (९.२ कोटी) आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांना डोस देण्यात मोठे यश मिळविले आहे. दिल्लीसह इतर राज्य सर्व प्रौढांना लसीचा पहिला डोस देण्यात यशस्वी झाले आहेत.
चीननंतर भारत लसीकरणात ऐतिहासिक टप्पा गाठणारा जगातील पहिला देश असेल. अमेरिकेला जेमतेम ४० कोटी डोसचा पल्ला गाठता आला; परंतु, भारताने ७० कोटी लोकांना लसीचा पहिला डोस देऊन मोठी मजल गाठली.
१०० कोटी डोसचे उद्दिष्ट ७ ऑक्टोबर रोजी साध्य करता आले असते, परंतु, कमी पुरवठा झाल्याने लांबले.
लसींमुळे इतर काेराेना विषाणूंविराेधातही संरक्षण मिळते
वाॅशिंग्टन : जगाला काेराेना महामारीने गेल्या दीड वर्षांपासून वेठीस धरले आहे. महामारीतून बाहेर पडण्यासाठी काेविड १९ प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे.
या लसी तसेच पूर्वी झालेला काेविड १९ विषाणूचा संसर्ग याचप्रकारच्या इतर विषाणूंपासून संरक्षण देत असल्याचे एका संशाेधनातून आढळून आले आहे.
‘जरनल ऑफ क्लिनीकल इन्व्हेस्टीगेशन’ मासिकामध्ये यासंदर्भात संशाेधनातील निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यातून सार्वत्रिक काेराेना प्रतिबंधक लस विकसित हाेऊ शकते का, याबाबत तर्कसंगत अभ्यास करण्यात आला.
तुम्हाला एका काेराेनाविषाणूचा संसर्ग झाल्यास इतर काेराेना विषाणूंपासून संरक्षण मिळू शकेल का? याबाबत संशाेधन करण्यात आले.
लसीकरण कार्यक्रम
दि. रोजचे डोस एकूण
(लाखात) (कोटीत)
१३ ३७.०८ ९६.८२
१४ ३१.२८ ९७.१४
१५ ९.२४ ९७.२३
१६ ४२.७५ ९७.६५
१७ १२.८५ ९७.७९
१८ ८७.२३ ९८.६७
१९ ३९.०२