Corona Vaccination : लस घेतल्यानंतर एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू नाही; एम्सचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 07:37 AM2021-06-06T07:37:24+5:302021-06-06T07:37:50+5:30
Corona Vaccination : ज्या लोकांनी कोरोना लसीचे एक किंवा दोन डोस घेतल्यानंतरही त्यांना हा आजार झाला तर त्याला ब्रेक थ्रू इन्फेन्शन असे म्हणतात. लस घेतलेल्या काही जणांमध्ये व्हायरल लोड जास्त असला तरी त्या संसर्गामुळे कोणीही मरण पावल्याचे उदाहरण समोर आले नाही.
नवी दिल्ली : कोरोना लस घेतल्यानंतरही या आजाराची बाधा झालेल्यांपैकी एकाही रुग्णाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेला नाही, असे एम्सने एप्रिल व मेमध्ये केलेल्या पाहणीतून आढळून आले. कोरोना लस घेण्याबद्दल अनेक जण द्विधा मनस्थितीत असतात. ग्रामीण भागात कोरोना लसीकरणापासून काही लोक पळ काढताना दिसतात. अशा लोकांना या पाहणीच्या निष्कर्षामुळे दिलासा मिळणार आहे.
कोरोना लस घेतल्यानंतरही या आजाराने बाधित झालेल्या ६३ जणांच्या प्रकृतीचा एम्समधील शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. त्यापैकी एकही जण कोरोनामुळे मरण पावला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे कोरोना लस ही माणसांसाठी उपकारक असल्याचे सिद्ध झाले असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
ज्या लोकांनी कोरोना लसीचे एक किंवा दोन डोस घेतल्यानंतरही त्यांना हा आजार झाला तर त्याला ब्रेक थ्रू इन्फेन्शन असे म्हणतात. लस घेतलेल्या काही जणांमध्ये व्हायरल लोड जास्त असला तरी त्या संसर्गामुळे कोणीही मरण पावल्याचे उदाहरण समोर आले नाही.
या पाहणीसाठी एम्सने ज्या ६३ रुग्णांच्या प्रकृतीचा अभ्यास केला, त्यातील ३६ रुग्णांनी कोरोना लसीचे दोन डोस तर २७ रुग्णांनी कोरोना लसीचा एकच डोस घेतला होता. त्या ६३ रुग्णांपैकी १० जणांनी कोविशिल्ड व ५३ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. त्यातील कोणीही कोरोनामुळे मरण पावलेले नाही.
लसीमुळे प्रतिकारशक्तीत वाढ
- कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्यांमध्ये व कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या. त्यामुळे त्यांची या आजाराविरोधात लढण्याची प्रतिकारशक्तीही वाढली.
- कोरोनातून बरे झालेल्यांच्या अंगात या
आजाराविरोधातील प्रतिकारशक्ती सुमारे तीन महिने कायम राहते. तर काही लोकांमध्ये त्याहून अधिक काळ प्रतिकारशक्ती टिकते.