Corona vaccination: गर्भवती महिलांनाही आता घेता येईल कोरोनावरील लस, NTAGIच्या शिफारशींना आरोग्य मंत्रालयाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 07:08 PM2021-07-02T19:08:09+5:302021-07-02T19:09:49+5:30
Corona vaccination in India: कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिमेत विविध वयोगटातील लोकांना कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी गर्भवती महिलांना मात्र अद्याप कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.
नवी दिल्ली - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी भारतात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. या लसीकरण मोहिमेत विविध वयोगटातील लोकांना कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी गर्भवती महिलांना मात्र अद्याप कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. (Corona vaccination in India) दरम्यान आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने NTAGI म्हणजेच नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनच्या शिफारशींना मान्यता दिली आहे. (Pregnant women can now get corona vaccine, NTAGI's recommendations approved by the Ministry of Health)
गर्भवती महिला आता कोविन अॅपवर नोंदणी करू शकतील. किंवा लस घेण्यासाठी थेट कोविड लसीकरण केंद्रामध्ये जाऊन लस घेऊ शकतात. कोरोनाच्या संसर्गाचा गर्भवती महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे समोर आले होते. त्यांच्यामध्ये अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत होता. तसेच गर्भावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे एका अध्ययनातून समोर आले होते.
अध्ययनामधून समोर आले की, अन्य महिलांच्या तुलनेमध्ये गर्भवती महिलांमध्ये गंभीर संसर्गाचा धोका आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांमध्ये प्रजनन कालावधी पूर्ण होण्यापूर्वी बाळाचा जन्म होण्याचा धोका अध्ययनात दिसून आला. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गर्भवती महिला गर्भावस्थेच्या कुठल्याही पातळीवर लस घेऊ शकतात.