Corona vaccination: आंदोलक शेतकऱ्यांनी भाजपा आमदाराला लसीकरण केंद्रात जाण्यापासून रोखले, आरोग्य कर्मचाऱ्यांना पळवले
By बाळकृष्ण परब | Published: January 16, 2021 04:00 PM2021-01-16T16:00:07+5:302021-01-16T16:03:06+5:30
Corona vaccination in India Update : कोरोना लसीकरणाच्या मोहिमेवर शेतकरी आंदोलनाचा परिणाम दिसून आला. लसीकरणाच्या शुभारंभावेळी लसीकरण केंद्रात येणाऱ्या भाजपाच्या स्थानिक आमदारांना स्थानिक शेतकऱ्यांकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला.
कैथल (हरियाणा) - देशभरात आजपासून कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस दिली जात आहे. दरम्यान, हरियाणामधील कैथल येथे कोरोना लसीकरणाच्या मोहिमेवर शेतकरी आंदोलनाचा परिणाम दिसून आला. लसीकरणाच्या शुभारंभावेळी लसीकरण केंद्रात येणारे भाजपाचे स्थानिक आमदार लीलाराम यांना स्थानिक शेतकऱ्यांकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. भारतीय किसान युनियनकडून हे आंदोलन करण्यात आले. तसेच लसीकरण केंद्रातून आरोग्य कर्मचाऱ्यांनाही पळवून लावण्यात आले.
कोरोनाची लस सर्वप्रथम हरियाणा सरकारमधील मंत्री, आमदार आणि अन्य राजकारण्यांना देण्यात यावी, त्यानंतरच उर्वरित सर्वसामान्यांना ती देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक आंदोलकांकडून करण्यात आली. एवढेच नाही तर आंदोलक शेतकऱ्यांनी कोरोनाची लस आणि अन्य वैद्यकीय साहित्यसुद्धा परतवून लावले. तसेच लसीकरण केंद्रात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही पिटाळून लावले.
आज देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यामध्ये देशातील एक कोटी ६० लाख कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय संरक्षण कर्मचारी तसे इतर फ्रंटलाइन वर्कर्सनाही कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेसाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून एकूण तीन हजार सहा लसीकरण केंद्रे उघडण्यात आली आहेत. त्यामधून पहिल्या दिवशी सुमारे तीन लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.