Corona Vaccination: कोरोनाविरोधातील लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये असेल ९ ते १२ महिन्यांचे अंतर, सूत्रांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 02:44 PM2021-12-26T14:44:55+5:302021-12-26T14:53:16+5:30
Corona Vaccination In India: कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर हे ९ ते १२ महिन्यांपर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. भारताच्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये Covishield आणि Covaxinच्या डोसांमधील अंतर किती असावे याबाबत अभ्यास केला जात आहे. तसेच याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.
नवी दिल्ली - कोरोनाच्या नव्या आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाविरोधील लसींचे बुस्टर किंवा प्रिकॉशन डोस देण्याची तयारी सुरू झाली आहे. भारतामध्ये जानेवारी महिन्यापासून ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाविरोधातील लसीचा प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर हे ९ ते १२ महिन्यांपर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी आज ही माहिती दिली आहे. सूत्रांनी सांगितले की, भारताच्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिंनच्या डोसांमधील अंतर किती असावे याबाबत अभ्यास केला जात आहे. तसेच याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. (Covid-19 Precaution Dose)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला संबोधित करताना १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोविड-१९ विरोधात लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू करण्याची तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना साठी प्रिकॉशन डोस १० जानेवारीपासून देण्याची घोषणा केली होती. ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता.
मोदींनी सांगितले की, खबरदारीचं पाऊल म्हणून १० जानेवारीपासून ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आणि अन्य गंभीर आजार असलेल्या नागरिकांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रिकॉशन डोस दिला जाईल. प्रिकॉशन डोस लसीकरणामधील तिसरा डोस असेल. मात्र मोदींनी या डोसचा उल्लेख बुस्टर डोस असे करणे मात्र टाळले.
सूत्रांनी सांगितले की, लसीकरण विभाग आणि लसीकरणावर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागास समूह (एनटीएआय) ने या विषयी चर्चा करण्याबरोबरच कोविडच्या लसीचा दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर नऊ ते १२ महिने असेल अशी शक्यता वर्तवली आहे. भारतामध्ये आतापर्यंत ६१ टक्क्यांहून अधिक प्रौढ लोकसंख्येला कोरोनाविरोधातील लसीचे दोन डोस मिळाले आहेत.
त्याचबरोबर देशातील ९० टक्क्यांहून अधिक वयस्कर लोकसंख्येला कोरोनाच्या लसीचा पहिला डोस मिळाला आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या रिपोर्टनुसार गेल्या २४ तासांमध्ये ३२ लाख ९० हजार ७६६ डोस दिले गेले त्याबरोबरच देशातील कोरोनाच्या एकूण डोसची संख्या ही १४१.३७ लाखपेक्षा अधिक झाली आहे.