Corona Vaccination: दरराेज ४० लाख लसीकरणाचे लक्ष्य; केंद्र सरकार राज्यांना ६.०९ कोटी मात्रा विनामूल्य देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 07:11 AM2021-05-31T07:11:04+5:302021-05-31T07:11:35+5:30
सरकारने लसीकरणाच्या धोरणात बदल केल्यामुळे त्या तुलनेत मेमध्ये रोजचे लसीकरण सरासरी २१.३० लाखांवर आले.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : देशात जून महिन्यात कोरोनावरील लसीच्या ४० लाख मात्रा रोज दिल्या जाऊ शकतील. मे महिन्यात ६.६० कोटी मात्रा दिल्या गेल्या असून, राज्यांना जूनमध्ये लसीच्या १२ कोटी मात्रा उपलब्ध करून दिल्या जातील. एप्रिलमध्ये रोज ३० लाख जणांना लस दिली. सरकारने लसीकरणाच्या धोरणात बदल केल्यामुळे त्या तुलनेत मेमध्ये रोजचे लसीकरण सरासरी २१.३० लाखांवर आले.
सरकारने म्हटले की, जूनमध्ये आम्ही ६.०९ कोटी लस मात्रा राज्यांना विनामूल्य उपलब्ध करून देऊ व राहिलेल्या ५.८६ कोटी मात्रा राज्ये व खासगी रुग्णालये उत्पादकांकडून थेट विकत घेऊ शकतील. अशा प्रकारे १२ कोटी लस मात्रा उपलब्ध होतील. यामुळे भारतात जूनमध्ये लसीच्या रोज ४० लाख मात्रा दिल्या जातील, अशी आशा निर्माण झाली आहे.
ठरल्यापेक्षा अधिक
मे महिन्यात ठरविलेल्या कोट्यापेक्षा हे लक्ष्य जास्तच आहे. मे महिन्यात केंद्राने राज्यांना ४.०३ कोटी मात्रा विनामूल्य दिल्या होत्या.
राहिलेल्या ३.९० कोटी मात्रा राज्ये व खासगी रुग्णालयांना दिल्या. परंतु, एकूण ७.९४ कोटींपैकी फक्त ६.६० कोटी मात्रा मे महिन्यात दिल्या. त्यामुळे रोजची सरासरी घसरून २१.३० लाख मात्रांवर आली.
...तर एक कोटी मात्रा हव्या
भारतात १८ वर्षांवरील ९४ कोटी लोकसंख्येला लसीच्या दोन्ही मात्रा द्यायच्या असतील तर रोज एक कोटी लस मात्रा दिल्या जाव्या लागतील. हे लक्ष्य गाठण्यास बराच प्रवास करावा लागेल.
उपलब्धतेबाबत खुलासा नाही
उत्पादन वाढविल्यानंतरही उपलब्धता कमी का झाली याचा अधिकृत खुलासा उपलब्ध नाही. पंतप्रधान टास्क फोर्सचे लसीकरण मोहिमेचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी या आधी असा दावा केला होता की, ३१ डिसेंबरपर्यंत भारतात २१६ कोटी लस दिल्या गेलेल्या असतील.
लसीकरणाची सद्य:स्थिती
एकूण मासिक मात्रा रोजची सरासरी
एप्रिल ९ कोटी ३० लाख
मे ६.६० कोटी २१.३० लाख
जून (लक्ष्य) १२ कोटी ४० लाख