Corona Vaccination: मस्तच! कोविशील्ड लस घेताच १० वर्षे जुना आजार छूमंतर; ज्येष्ठ नागरिकाला सुखद धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 10:47 AM2021-06-20T10:47:05+5:302021-06-20T10:49:03+5:30
Corona Vaccination: १० वर्ष डॉक्टरांना दूर करता न आलेली समस्या कोरोना लसीमुळे दूर
इटावा: देशातील कोरोना रुग्णांची दिवसागणिक कमी होत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानं दिलासा मिळाला असला तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे लसीकरण अभियानाला वेग देण्याचं काम सुरू आहे. मात्र काही ठिकाणी लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे. मात्र उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. कोविशील्ड लसीचा डोस घेतल्यानंतर एका ज्येष्ठ नागरिकाला सुखद धक्का बसला आहे.
इटावा जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या गोरेलाल शाक्य नावाच्या व्यक्तीनं कोविशील्डची लस घेतली. त्यानंतर त्यांची १० वर्षांपासूनची कंबरदुखीची समस्या दूर झाली. गोरेलाल इटावातील ताखा तहसीलमधील ढांडेहार गावचे रहिवासी आहेत. ५५ वर्षांच्या गोरेलाल यांनी १५ एप्रिलला कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर त्यांची कंबरदुखीची समस्या दूर झाली. गेल्या १० वर्षांपासून त्यांना कंबरदुखीचा त्रास होता.
कंबरदुखी बरी व्हावी यासाठी गोरेलाल शाक्य यांनी १० वर्षांपासून अनेक प्रयत्न केले. डॉक्टरांकडून उपचार घेतले. मात्र तरीही उपयोग झाला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोरेलाल यांच्या गावात लसीकरण मोहीम सुरू झाली. गोरेलाल यांनी तिथे केंद्रावर जाऊन लस टोचून घेतली. त्यानंतर शरीरातील वेदना दूर झाल्याचा दावा गोरेलाल यांनी केला.
काही दिवसांपूर्वी गोरेलाल शाक्य त्यांच्या शेतीच्या मोजणीसाठी ताखा तहसीलला गेले होते. तिथे त्यांनी कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सची चर्चा ऐकली. तेव्हा गोरेलाल यांनी त्यांचा अनुभव सांगितला. 'गेल्या १० वर्षांपासून माझ्या शरीरात वेदना व्हायच्या. अनेक डॉक्टरांकडे जाऊन त्यांना माझी समस्या सांगितली. इटावाला जाऊन उपचार घेतले. मात्र कोणताही फायदा झाला नाही. पण कोरोना प्रतिबंधात्मतक लस घेताच शरीरातील वेदना दूर झाल्या,' अशा शब्दांत गोरेलाल यांनी स्वानुभव सांगितला. प्रत्येकानं लस घ्यायला हवी असं आवाहनदेखील त्यांनी केलं.