Corona Vaccination: अमेरिकेने निर्बंध हटविले; लस उत्पादन होणार सुलभ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 06:08 AM2021-06-05T06:08:21+5:302021-06-05T06:08:49+5:30
तरणजितसिंग संधू यांची माहिती; पुरवठा साखळी सुरळीत होणार
वॉशिंगटन : अमेरिकेने ‘संरक्षण उत्पादन कायदा’ (डीपीए) हटविला असून त्यामुळे पुरवठा साखळीतील अडथळे दूर होऊन कोरोनाविरोधातील लसीचे उत्पादन अधिक सुलभ होईल, अशी माहिती भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजितसिंग संधू यांनी दिली.
संधू यांनी सांगितले की, अमेरिकेच्या संरक्षण उत्पादन कायद्याचा अंमल संपल्यामुळे आता पुरवठ्यातील प्राधान्ये दूर झाली आहेत. ॲस्ट्राजेनेका व नोव्हॅक्स यासारख्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेली पुरवठा साखळी त्यामुळे सुलभ होईल.
सूत्रांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लसीच्या बाबतीत अमेरिकी नागरिकांना प्रथम प्राधान्य मिळावे यासाठी अमेरिकी सरकारने संरक्षण उत्पादन कायदा देशात लागू केला होता. त्यामुळे कंपन्यांना सरकारच्या परवानगीशिवाय निर्यात करता येत नव्हती. अमेरिकेबाहेर उत्पादित होणाऱ्या लसींना याचा मोठा फटका बसला होता. भारतातील लस उत्पादकांनाही या कायद्याचा फटका बसला आहे. या कायद्याचा अंमल आता हटला आहे. त्यामुळे कोणत्या देशाला कोणत्या वस्तूंची निर्यात करायची याचा निर्णय कंपन्या स्वत:च्या अखत्यारित घेऊ शकतील.
व्हाईट हाऊसचे ‘कोविड-१९ प्रतिसाद’ समन्वयक जेफ जिएंट्स यांनी संरक्षण उत्पादन कायदा हटविण्यात येत असल्याची घोषणा गुरुवारी केली होती. आपल्या निवेदनात त्यांनी ॲस्ट्राजेनेका, नोव्हॅक्स आणि सनोफी या लसींचा उल्लेखही केला होता.