Corona vaccination: उत्तर प्रदेशात २० जणांना पहिला डोस कोविशिल्डचा, तर दुसरा कोव्हॅक्सिनचा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 08:10 AM2021-05-28T08:10:35+5:302021-05-28T08:11:05+5:30
Corona vaccination: उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांपैकी २० जणांना नजरचुकीने कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. हा भोंगळ कारभार उजेडात येताच खळबळ माजली आहे
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांपैकी २० जणांना नजरचुकीने कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. हा भोंगळ कारभार उजेडात येताच खळबळ माजली आहे, तसेच लस घेतलेल्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र, एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या लसी घेतल्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही. आम्ही या २० जणांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत असे केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार व जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशमधील एका गावामध्ये हा प्रकार घडला. तेथील आरोग्य केंद्रात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गावकऱ्यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. त्यानंतर १४ मे रोजी हे लोक दुसरा डोस घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. पहिला डोस एका लसीचा व दुसरा डोस वेगळ्याच लसीचा दिल्याचे लक्षात आल्यावर या प्रकाराची चौकशी करण्यात आली.
जगातील काही देशांत नागरिकांना दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्याचे प्रयोग होत आहेत. लसींच्या तुटवड्यामुळेही असे प्रयोग होतात. मात्र, त्यासाठी योग्य पद्धतीने मानवी चाचण्या होतात. त्यातून ठोस निष्कर्ष काढले जातात व नंतरच सर्वसामान्य नागरिकांना दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्याचे पाऊल उचलले जाते.