Corona Vaccination: कोरोनाविरोधातील लसीकरण 50 काेटींवर! रुग्णवाढ हाेत असतानाच दिलासादायक चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 08:02 AM2021-08-07T08:02:59+5:302021-08-07T08:03:51+5:30
Corona Vaccination in India: देशामध्ये लसीचा डाेस घेणाऱ्यांची संख्या ५० काेटींवर गेली असून एकीकडे रूग्णवाढ हाेत असतानाच लसीकरणाचे दिलासादायक चित्रही समाेर आले आहे.
नवी दिल्ली : देशामध्ये लसीचा डाेस घेणाऱ्यांची संख्या ५० काेटींवर गेली असून एकीकडे रूग्णवाढ हाेत असतानाच लसीकरणाचे दिलासादायक चित्रही समाेर आले आहे. यामध्ये पहिला डाेस घेणारे ३९ काेटी तर दुसरा डाेस पूर्ण करणारे ११ काेटी जण आहेत. लसीचा एकही डाेस न घेणाऱ्यांमध्ये नवीन काेराेना रुग्ण माेठ्या संख्येने आढळत आहेत.
गेल्या चोवीस तासांत ४४६४३ नवे कोरोना रुग्ण आढळले तर ४१,०९६ रुग्ण यातून बरे झाले. नव्या रुग्णांचे हे प्रमाण गेल्या महिनाभरातील सर्वाधिक आहे. केरळमध्ये सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत. उपचार घेणाऱ्यांचा आकडा ४ लाख १४ हजारांवर गेला असून आणखी ४६४ जण या संसर्गाने मरण पावले. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवा अशी सूचना केंद्र सरकारकडून राज्यांना वारंवार दिली जात आहे.
कोरोना संसर्गाने आतापर्यंत ४ लाख २६ हजार ७५४ जण मरण पावले. उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण १.३० टक्के आहे.
- दररोजचा व आठवड्याचा संसर्गदर अनुक्रमे २.७२ टक्के व २.४१ टक्के आहे. दररोजचा संसर्गदर सलग ११ व्या दिवशी ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
- संसर्गातून ९७.३६ टक्के रुग्ण बरे झाले. आजवर पार पडलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या ४७ कोटी ६५ लाख ३३ हजार ६५० झाली आहे. तर मृत्यूदर १.३४ टक्के आहे.
जगात दीड कोटी लोकांवर उपचार सुरू
n जगामध्ये २० कोटी १७ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील
१८ कोटी १४ लाख जण बरे झाले.
n १ कोटी ५९ लाख लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर, ४२ लाख ८० हजार लोकांचा मृत्यू झाला.
n अमेरिकेमध्ये ३ कोटी ६३ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील ३ कोटी १० लाख रुग्ण बरे झाले व ५८ लाख ६४ हजार लोकांवर उपचार सुरू आहेत.
n कोरोनामुळे अमेरिका व ब्राझिलमध्ये अनुक्रमे ६ लाख ३१ हजार व ५ लाख ६० हजार जणांचा मृत्यू झाला.
‘जॉन्सन’चा लसीच्या मंजुरीसाठी अर्ज
अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने आपल्या एका डोसच्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. याआधीही सदर कंपनीने असा अर्ज केला होता. मात्र आता मान्यताप्राप्त लसींसाठी चाचण्यांची अट केंद्राने दूर केली असल्याने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला थेट मंजुरीसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते.