Corona Vaccination: सप्टेंबर अखेरपर्यंत थांबा! WHOची श्रीमंत देशांना सूचना; भारताला होणार मोठा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 09:45 AM2021-08-05T09:45:08+5:302021-08-05T09:46:05+5:30
Corona Vaccination: जागतिक आरोग्य संघटनेचं श्रीमंत देशांना महत्त्वाचं आवाहन
दीड वर्ष उलटून गेल्यावरही कोरोना विषाणूचं संकट कायम आहे. त्यातच कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अधिक संक्रामक असल्यानं चिंता वाढली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनादेखील कोरोनाची लागण होत असल्याचं आढळून आलं आहे. डेल्टा व्हेरिएंट रोगप्रतिकारशक्तीला चकवा देत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे भारतीयांची चिंता वाढली आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर डेल्टाची लागण होत असल्यानं कोट्यवधी भारतीयांचं टेन्शन वाढलं आहे. भारतातील लक्षावधी लोकांना अद्याप कोरोना लसीचा एकही डोस मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं श्रीमंत देशांना एक महत्त्वाची सूचना केली आहे. कोरोना लसीचा बूस्टर डोस देणं थांबवा असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) केलं आहे. अनेक देशांमधील लक्षणीय लोकसंख्या अद्याप कोरोना लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित आहे. त्यांना लस मिळावी या हेतूनं डब्ल्यूएचओनं हे आवाहन केलं आहे.
विकसित देश कोरोना लसीकरण मोहिमेत विकसनशील देशांच्या तुलनेत खूप पुढे आहेत. या विकसित देशांनी सप्टेंबरच्या अखेरपर्यंत बूस्टर डोस देऊ नये असं आवाहन डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधोनम यांनी केलं आहे. विकसनशील देशापर्यंत जास्तीत जास्त कोरोना लसी पोहोचाव्यात यासाठी पावलं टाकण्याचं आवाहनही डब्ल्यूएचओकडून करण्यात आलं आहे.