Corona Vaccine: १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना मिळणार कोरोनाची लस; केंद्राचा महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 07:07 AM2021-03-24T07:07:17+5:302021-03-24T07:07:36+5:30
केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत देशभरातील ५ कोटी १७ लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली.
नवी दिल्ली : कोणतीही सहव्याधी नसलेल्या ४५ वर्षे वयावरील सर्व व्यक्तींना १ एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लस घेता येऊ शकणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देताना जावडेकर म्हणाले की, ४५ वर्षे वयावरील तसेच कोणत्याही सहव्याधी नसलेल्या व्यक्ती आता १ एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पात्र असतील. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कृती दल तसेच वैद्यकीय तज्ज्ञ यांच्याशी सल्लामसलत करूनच हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच लसीची दुसरी मात्रा सहा ते आठ आठवड्यांनी घ्यावी, असेही सूचित करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पात्र ठरणाऱ्या सर्वांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जावडेकर यांनी यावेळी केले.
देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले असता ज्या राज्यांमध्ये बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे त्या राज्य प्रमुखांशी केंद्र सरकार संपर्क साधून आहे. या राज्यांना सर्व प्रकारचे सहाय्य केले जात असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत ५ कोटी लोकांचे लसीकरण
- केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत देशभरातील ५ कोटी १७ लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली.
- देशात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरेसा साठा असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे ते म्हणाले. दोन्ही लसींची परिणामकारकता उत्तम असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.
लसींमुळे रक्ताच्या गुठळ्या नाहीत
- काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन या लसींमुळे रक्ताच्या गुठळ्या हाेत नसल्याचे केंद्र सरकारच्या एका उच्चस्तरीय समितीने स्पष्ट केले.
- लसींच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली हाेती. या समितीने ४०० हून अधिक दुष्परिणामाच्या घटनांचा अभ्यास केला. त्याचा अहवाल समितीने सादर केला आहे.
- काेविशिल्ड किंवा काेव्हॅक्सिनमुळे अनियमित रक्तस्त्राव किंवा रक्ताच्या गुठळ्या बनत नसल्याचे या समितीने म्हटले आहे.