Corona Vaccine: कोविड लसीचा दुसरा डोस घेताना ‘ही’ मोठी चूक टाळा, अन्यथा...; सरकारनं केलं अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 08:28 AM2022-05-10T08:28:22+5:302022-05-10T08:30:04+5:30
लसीकरणावेळी लोकांना फोन नंबरवरून अपडेट दिले जातात. त्यामुळे जर कुणी मोबाईल नंबर बदलला तर त्याला डोस घेऊनही लसीकरण प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येतील.
नवी दिल्ली – मागील २ वर्षापासून जगभरात कोरोना महामारीनं हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरसविरुद्ध सर्वात मोठं शस्त्र म्हणजे लसीकरण मानलं जात आहे. भारतात १८ वर्षावरील सर्वांना बूस्टर डोस दिला जात आहे. त्याचसोबत ५ वर्षावरील मुलांचेही लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. मात्र लसीकरण करतेवेळी होणाऱ्या एका मोठ्या चुकीबाबत सरकारने लोकांना अलर्ट जारी केला आहे.
सरकारने सोमवारी सांगितले की, कोविड १९ चा पहिला डोस घेतल्यानंतर लाभार्थीला दुसरा डोस घेतेवेळी त्याच मोबाईल नंबरचा वापर करायला हवा ज्याचा वापर पहिल्या डोसवेळी केला होता. जर एखाद्याने दुसऱ्या डोसवेळी चुकीचा किंवा नवीन नंबर दिला तर तो त्याचा पहिला डोस म्हणून ग्राह्य धरण्यात येत असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. लसीकरणावेळी लोकांना फोन नंबरवरून अपडेट दिले जातात. त्यामुळे जर कुणी मोबाईल नंबर बदलला तर त्याला डोस घेऊनही लसीकरण प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येतील.
कोविनमधील तांत्रिक बिघाडामुळे महाराष्ट्रातील पुण्यात अडीच लाख लोकांना पहिल्या डोसचे २ प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहेत. त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण देत कोविनने देशातील लसीकरण कार्यक्रमात डिजिटली यशस्वीरित्या काम केले आहे. त्यात कुठलीही गडबड नाही. कोविन देशातील १०० कोटीहून अधिक लोकांच्या लसीकरणात १९० कोटीपेक्षा जास्त डोस दिल्याचं सांगितले आहे.
नोंदणी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
आरोग्य मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, नोंदणीसाठी एखाद्या व्यक्तीने आपला मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे. यासोबतच लसीकरणाची निर्धारित वेळ, नाव, वय (जन्म वर्ष) आणि लिंग यांची माहिती घेऊन केंद्रावर जाऊन लस घेण्याची सोय आहे. ओळखीचा पुरावा म्हणून ९ फोटो ओळख पुराव्यांमधून निवडण्याचा पर्याय आहे.
दोन्ही डोससाठी एकच नंबर वापरा: सरकार
आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर, लाभार्थ्याने लसीकरणाच्या पहिल्या डोसच्या वेळी वापरलेल्या मोबाईल नंबरसह त्याच लसीचा दुसरा डोस घ्यावा लागेल. हे लक्षात घ्यावे. पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी ही एकमेव यंत्रणा आहे. "तुम्ही दुसऱ्या डोससाठी वेगळा मोबाइल नंबर वापरल्यास आणि लसीकरण शेड्यूल केल्यास, तो आपोआप पहिला डोस म्हणून ओळखला जाईल," असे निवेदनात म्हटले आहे. शिवाय, एकच ओळखीचा पुरावा दोन भिन्न मोबाइल क्रमांकांसह वापरण्याची परवानगी नाही.