Corona vaccine: कोरोनाविरोधातील लस घेणार का? बाबा रामदेव यांनी असे उत्तर दिले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 09:16 AM2021-06-10T09:16:12+5:302021-06-10T09:17:08+5:30
Baba Ramdev News: आयुर्वेदाचा पुरस्कार करणाऱ्या बाबा रामदेव यांना कोरोनाविरोधातील लस घेणार का अशी विचारणा करण्यात आली होती. तेव्हा ते म्हणाले की...
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाचा योगगुरू बाबा रामदेव यांच्या वक्तव्यांमुळे होमिओपॅथी विरुद्ध अॅलोपॅथी असा वाद सुरू झाला होता. दरम्यान, आता बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी कोरोना लसीबाबत मोठे विधान केले आहे. आयुर्वेदाचा पुरस्कार करणाऱ्या बाबा रामदेव यांना कोरोनाविरोधातील लस घेणार का अशी विचारणा केली असता त्यांनी कोरोनावरील लस घेणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून देशातील प्रत्येक राज्यामध्ये १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधानांनी उचललेल्या या पावलामध्ये मीसुद्धा भागीदार होणार आहे. ( Baba Ramdev said I will also get vaccinated against corona)
बाबा रामदेव यांनी सांगितले की, मी लवकरच कोरोनावरील लस घेणार आहे. मात्र आपल्या जीवनात योग आणि आयुर्वेदाचा समावेश केला पाहिजे. योग हा आजारपणांसमोर एखाद्या ढालीप्रमाणे आहे. योग कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीपासून रक्षण करतो. मात्र शस्त्रक्रिया आणि आणीबाणीच्या परिस्थितीत अॅलोपॅथी ही सर्वश्रेष्ठ उपचार पद्धती आहे. माझा कुठल्याही संघटनेला तसेच उपचारपद्धतीला विरोध नाही. माझी लढाई तर ड्र्ग माफियांविरोधात आहे.
चांगले डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूतांप्रमाणे आहेत. मात्र अनावश्यक औषधे आणि उपचारांच्या नावाखाली कुणाचेही शोषण करता कामा नये. यावेळी बाबा रामदेव यांनी पंतप्रधान जनऔषधी केंद्रांचेही कौतुक केले. केंद्र सरकारने उचललेल्या या पावलामुळे लोकांना कमी खर्चात जेनेरिक औषधे सहजपणे उपलब्ध करता येतील.
गेल्या काही दिवसांपासून आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यात अॅलोपॅथीवरून वाद सुरू आहे. हल्लीच बाबा रामदेव यांनी डॉक्टरांबाबत काही वादग्रस्त विधाने केली होती. त्यानंतर आयएमएशी संबंधित डॉक्टरांनी रामदेव बाबांवर आक्षेप घेतला होता.
मात्र बाबा रामदेव यांनी आपल्या विधानांवर स्पष्टीकरण देताना याबाबत खेद व्यक्त केला होता. दरम्यान रामदेव बाबांच्या या मुक्ताफळांनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही त्यांना पत्र लिहून त्यांनी केलेल्या विधानांवर आक्षेप घेतला होता. तसेच बाबा रामदेव यांच्या विधानांविरोधात अनेक शहरांमध्ये तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.