Corona Vaccine : सावधान ! बुस्टर डोसच्या नावे ऑनलाईन फसवणूक, बँक अकाऊंट होईल रिकामं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 03:19 PM2022-01-11T15:19:29+5:302022-01-11T15:20:24+5:30
Corona Vaccine : कोरोना लसीकरणाच्या बुस्टर डोसला 10 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. 60 वर्षे वयाच्या आणि दुसरा डोस घेऊन 9 महिने झालेल्या नागरिकांनाच हा बुस्टर डोस देण्यात येत आहे.
मुंबई - ऑनलाईन खरेदी विक्री व्यवहार वाढल्याने आता ऑनलाईन आर्थिक व्यवहारही मोठ्या प्रमाणात होत आहेत. मात्र, या ऑनलाईन व्यवहारातून आर्थिक स्कॅमही वाढले आहेत. अनेकदा लकी नंबर लागल्याचं सांगत, किंवा लॉटरी लागल्याचे सांगत ग्राहकांची फसवणूक केली जाते. नवनवीन आयडिया लढवून मोबाईल युजर्संना फसवले जाते. आता, कोविड व्हॅक्सीनचा बुस्टर डोस देण्याच्या नावाने ऑनलाईन फसवणूक होत आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनीही यासंदर्भात सावधानतेचा इशारा दिला आहे.
कोरोना लसीकरणाच्या बुस्टर डोसला 10 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. 60 वर्षे वयाच्या आणि दुसरा डोस घेऊन 9 महिने झालेल्या नागरिकांनाच हा बुस्टर डोस देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर वयोवद्धांनाच फसविण्यात येत आहे. म्हणून, ज्येष्ठ नागरिकांनी सावधान राहायला हवं. या कॉलद्वारे फोन करणारी व्यक्ती सरकारी कार्यालयाचा हवाला देत नागरिकांशी संवाद साधत आहे. तसेच, आपण लसीचे दोन डोस घेतले का, अशी विचारणा करतात. त्यानंतर, तिसऱ्या बुस्टर डोससाठी आपलं रजिस्ट्रेशन करण्यात येत आहे. त्यासाठी, आपला आधार नंबर, नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक विचारण्यात येतो. संबंधित व्यक्तीला खात्री वाटावी यासाठी ही विचारणा केली जाते. त्यानंतर, तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी पाठविण्यात येतो. नोंदणीसाठी हा ओटीपी सांगण्याची सूचवले जाते. मात्र, हा ओटीबी बँक ट्रान्झेक्शनशी रिलेटेड असतो. त्यामुळे, आपण हा ओटीपी इतरांशी शेअर केल्यास तुमचे बँक अकाऊंट रिकामं होऊ शकतं.
दरम्यान, सध्या बुस्टर डोसची चर्चा असल्याने त्यानावे हा स्कॅम केला जात आहे. तरी, नागरिकांनी सावधानता बाळगत संबंधित व्यक्तीशी किंवा अनोळखी व्यक्तीशी ऑनलाईन व्यवहार करू नये. तसेच मोबाईलवर आलेला ओटीपी सांगू नये, असे आवाहनही करण्यात येत आहे. बुस्टर डोससाठी आरोग्य विभागाशीच संपर्क साधावा.