Corona vaccine: भारत बायोटेकने ‘WHO’ कडे सादर केले ९०% दस्तावेज, ‘कोव्हॅक्सिन’ला वापराची हवी परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 06:22 AM2021-05-25T06:22:28+5:302021-05-25T06:24:32+5:30
Corona vaccine Update: हैदराबादस्थित उत्पादक कंपनी भारत बायोटेकने लसीचा तातडीचा उपयोग करण्याची परवानगी असलेल्या यादीत स्थान मिळावे म्हणून संघटनेकडे आता ९० टक्के दस्तावेज सादर केले आहेत.
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) यादीत कोरोनावरील लस कोव्हॅक्सिन नसल्यामुळे ही लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना परदेशात प्रवेश करता येणार नाही, असे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर या लसीची हैदराबादस्थित उत्पादक कंपनी भारत बायोटेकने लसीचा तातडीचा उपयोग करण्याची परवानगी असलेल्या यादीत स्थान मिळावे म्हणून संघटनेकडे आता ९० टक्के दस्तावेज सादर केले आहेत.
सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार उर्वरित दस्तावेज जून महिन्यात सादर होण्याची अपेक्षा आहे, असे कंपनीने संघटनेकडून तातडीच्या वापरासाठीची परवानगी मिळविण्याच्या विषयाबाबत चर्चेत केंद्र सरकारला सांगितले.
कंपनीला विश्वास
जागतिक आरोग्य संघटनेकडून तातडीच्या वापराची परवानगी मिळेल असा आत्मविश्वास कंपनीला आहे. सूत्रांनी असे म्हटले की, कोव्हॅक्सिनला ११ देशांतून नियामक मान्यता आणि सात देशांतून तंत्रज्ञान हस्तांतर आणि उत्पादनासाठी ११ कंपन्यांचा इंटरेस्ट मिळाला आहे.
अमेरिकेत छोट्या प्रमाणात टप्पा तीनच्या क्लिनिकल ट्रायल्स करण्यासाठी कंपनीची तेथील अन्न आणि औषध प्रशासनाशी अंतिम टप्प्यातील बोलणी सुरू आहे. प्रकरणावर निर्णय घेत नाही तोपर्यंत मात्र प्रवाशांवर टांगती तलवार कायम राहणार आहे.