Corona Vaccine :मुलांना खरंच 'एक्स्पायरी' झालेली लस दिली?; केंद्र सरकारकडून महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 05:01 PM2022-01-04T17:01:04+5:302022-01-04T17:10:31+5:30
सीडीएससीओ संस्थेने यापूर्वीच कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसींची साठवण मुदत अनुक्रमे 12 आणि 9 महिन्यांपर्यंत वाढविली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
नवी दिल्ली - देशभरात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील युवकांना कोरोनावरील लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, युवकांना देण्यात येत असलेल्या या लसींच्या डोसची मुदत संपली असल्याच्या तक्रारी सोशल मीडियातून येत आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी ट्विटरवरुन फोटो शेअर करत याबाबत माहितीही आहे. मात्र, याबाबत आता आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिलंय. भारतातील नागरिकांना मुदत संपलेल्या लसी दिल्या जात आहेत, अशा आशयाच्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत. सीडीएससीओ संस्थेने यापूर्वीच कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसींची साठवण मुदत अनुक्रमे 12 आणि 9 महिन्यांपर्यंत वाढविली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
''माझा मुलगा लसीचा पहिला डोस घेण्यासाठी गेला असता, संबधित लस नोव्हेंबर महिन्यातच एक्सपायर झाल्याचं निदर्शन आलं. त्यानंतर, आम्हाला एक पत्र दाखविण्यात आलं. त्यामध्ये, एक्सपायरी डेट वाढविण्यात आल्याचे दिसून आले. असं का, कोणत्या आधारावर?'' असा प्रश्न नवनिता वरडपांडे यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. नवनिता यांचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे. त्यानंतर, सरकारच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भात स्पष्टीकरणही देण्यात आलंय. कोविड-19: गैरसमज आणि सत्य या मथळ्याखाली एका परित्रकातून आरोग्य विभागाने आपली बाजू मांडली आहे.
So my son went to get his first vaccine, the drive for kids begin today and realized that the vaccine had already expired in November. Then a letter was shown wherein it seems the shelf life has been extended!!How, why, on what basis?
— Navanita Varadpande (@VpNavanita) January 3, 2022
To clear stock you experiment on kids? pic.twitter.com/259ZHDBMSN
राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत भारतातील नागरिकांना मुदत संपलेल्या लसींच्या मात्रा दिल्या जात आहेत असा आरोप करणाऱ्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झाल्या आहेत. या बातम्या चुकीच्या आणि लोकांची दिशाभूल करणाऱ्या आहेत. मे. भारत बायोटेक आंतरराष्ट्रीय मर्या. या कंपनीच्या BBIL/RA/21/567 क्रमांकाच्या पत्राला प्रतिसाद देत सीडीएससीओ अर्थात केंद्रीय औषध मानके नियंत्रण संघटनेने 25 ऑक्टोबर 2021 रोजी, कोवॅक्सिन या लसीची साठवण मुदत मर्यादा 9 महिन्यांवरून वाढवून 12 महिने केली होती. त्याचप्रकारे सीडीएससीओने 22 फेब्रुवारी 2021 रोजी कोव्हिशिल्ड लसीची साठवण मुदत मर्यादा 6 महिन्यांवरून वाढवून 9 महिने केली होती, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
दोन्ही लसींच्या कार्यक्षमता स्थिरतेच्या अभ्यासाविषयी लस निर्मात्यांनी दिलेल्या माहितीचे परीक्षण तसेच समावेशक विश्लेषण यांच्या आधारेच राष्ट्रीय नियामक संस्थेने या लसींची साठवण मुदत मर्यादा वाढविली असल्याचेही स्पष्ट करण्यात आलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली.