रुग्णालयांमध्ये कोविड बूस्टरची मागणी वाढली, CoWIN वर मिळत नाही अपॉइंटमेंट!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 02:32 PM2022-12-28T14:32:49+5:302022-12-28T14:35:42+5:30
Corona vaccine : दिल्लीतील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, सध्या त्यांच्याकडे फक्त दोन दिवसांचा साठा आहे. ही लस ठेवण्यात आली होती, मात्र गेल्या महिन्यापासून ती परत पाठवण्यात आली होती.
नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. इतर अनेक देशांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोनाची परिस्थिती पाहून भारतातील लोकही घाबरले आहेत. दरम्यान, कोरोना लसीची मागणी खूप वाढली आहे. लोक को-विन पोर्टलवर जाऊन लसीसाठी रजिस्ट्रेशन करत आहेत. परंतु काही लोकांना अपॉइंटमेंट मिळू शकलेली नाही. याचे कारण काही रुग्णालयांमध्ये लसीचा पुरेसा साठा नाही. त्याचबरोबर, काही रुग्णालयांमध्ये केवळ एक-दोन दिवसांची लस शिल्लक आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून लोक लसीकरणासाठी येत नव्हते. त्यामुळे सध्याचा साठा परत पाठवण्यात आला, मात्र गेल्या दोन दिवसांपासून लस घेणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. सध्या फक्त एक दिवसाचा साठा उपलब्ध आहे. लसींच्या मागणीसाठी प्रशासनाला पत्र दिले आहे, असे दिल्लीतील संजय गांधी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. तसेच, दिल्लीतील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, सध्या त्यांच्याकडे फक्त दोन दिवसांचा साठा आहे. ही लस ठेवण्यात आली होती, मात्र गेल्या महिन्यापासून ती परत पाठवण्यात आली होती.
लस जास्त काळ ठेवल्यास ते खराब होऊ शकते. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, डॉक्टरांनी सांगितले की सध्या बूस्टर डोस घेणारे लोक येत आहेत. त्यामध्ये तरुण आणि ज्येष्ठांची संख्या अधिक आहे. आता ज्यांनी पूर्वी अपॉइंटमेंट घेतली होती त्यांना डोस दिला जात आहे. लसीच्या स्लॉटनुसार स्लॉट बुक केले जात आहेत.
कोरोना संदर्भात लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पूर्वीसारख्या धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे लोक लसीकरणासाठी रुग्णालयात जात आहेत. लसीकरण करून विषाणूची तीव्रता आणि लक्षणे कमी केली जाऊ शकतात, असे ज्येष्ठ फिजिशियन डॉ. अजय कुमार यांनी म्हटले आहे. दरम्यान, तरुण आणि निरोगी लोकांना घाबरू नका असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, आवश्यक असल्यासच बूस्टर डोस घ्या, परंतु घरातील वृद्ध व्यक्ती आणि जुनाट आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी लसीकरण करणे आवश्यक आहे.
नेझल लसीला केंद्र सरकारने दिली परवानगी
देशातील पहिल्या नेझल लसीला केंद्र सरकारनेही परवानगी दिली आहे. ही लस बूस्टर डोस म्हणून दिली जाऊ शकते. ज्या लोकांनी दोन डोस घेतले आहेत त्यांना नेझल लस मिळू शकते. ही लस नाकातून दिली जाते. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही लस अत्यंत प्रभावी असल्याचे म्हटले जात आहे.