लसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 12:45 AM2021-01-18T00:45:30+5:302021-01-18T06:56:12+5:30
मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी १६ जानेवारीपासून करण्यात आली. लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. तांत्रिक अडचण आली असता ऑफलाइन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती.
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबईसह राज्यात शनिवारपासून लसीकरण मोहीम वेगाने हाती घेण्यात आली असली तरीदेखील दुसऱ्याच दिवशी या लसीकरण मोहिमेला खीळ बसली आहे. कारण लसीकरणासाठीच्या कोविन-अॅपवर नाव-नोंदणी करण्यास अडथळा येणे. नाव-नोंदणी करतेवेळी किंवा नोंदणी झाल्यानंतर संदेश न जाणे अशा तांत्रिक समस्या येत आहेत. त्यामुळे रविवारसह सोमवारी असे दोन दिवस लसीकरण स्थगिती केल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले.
मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी १६ जानेवारीपासून करण्यात आली. लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. तांत्रिक अडचण आली असता ऑफलाइन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. तथापि, यापुढील सर्व नोंदी ॲपद्वारेच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र आता कोवीन ॲपमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले असून, ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाकडून सुरू आहेत. त्यामुळे कोविन ॲपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याने १७ सह १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस लसीकरण स्थगित करण्यात आले. कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.
मुंबईत एकाच वेळी १ कोटी २ लाख लस साठवणुकीची क्षमता आहे. कांजूरमार्ग, परळ यासोबतच अन्य सहा ठिकाणी साठवणूक क्षमता असून, लस देण्यास ५०० पथक व दिवसाला ५० हजार जणांना लस देण्याचे नियोजन आहे. महापालिकेने नऊ केंद्रांवर मिळून ४० लसीकरण बूथ कार्यान्वित केले आहेत. शासनाच्या वतीने जे. जे. रुग्णालय हे एक केंद्र कार्यान्वित केले. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे सुमारे १,३९,५०० डोस पालिकेला उपलब्ध झाले.