भोंगळ कारभार! 5 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेला दिला कोरोनाचा बूस्टर डोस, मेसेजने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 06:17 PM2022-08-09T18:17:41+5:302022-08-09T18:20:06+5:30
Corona Vaccine : आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. मृत्यू झाल्यानंतर महिलेला पाच महिन्यांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतल्याचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,751 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 526772 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान वेगाने लसीकरण सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. असं असताना आता आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. मृत्यू झाल्यानंतर महिलेला पाच महिन्यांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतल्याचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये ही हैराण करणारी घटना घडली आहे. कोविड 19 च्या बूस्टर डोसचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी एका मृत महिलेला बूस्टर डोस देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या महिलेचा मृत्यू 17 मार्च रोजीच झाला आहे. हे संपूर्ण प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा महिलेच्या मुलाला बूस्टर डोस घेतल्याचा मेसेज आला. मेसेज मिळाल्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र डाऊनलोड केलं तर बूस्टर डोसचं प्रमाणपत्रही डाऊनलोड झालं. सीएमओंनी आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
फिरोजाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे बूस्टर डोस लागू करण्यासाठी रविवारी जिल्ह्यात 321 ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 27 हजार लोकांना बूस्टर डोस देण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे या 27 हजार लोकांपैकी एक डोस या जगात नसलेल्या महिलेलाही देण्यात आला. बूस्टर डोससोबतच त्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले. अनार देवी यांचे 17 मार्च 2022 रोजी फिरोजाबादमधील एका गावात निधन झाले. त्यांच्या मृत्यूला आता पाच महिने झाले आहेत.
अनार देवी यांचा मुलगा राजच्या मोबाईलवर त्याच्या आईला कोविड-19 चा बूस्टर डोस देण्यात आल्याचा मेसेज आला तेव्हा कुटुंबातील सर्वांनाच धक्का बसला. मृत्यू झालेल्या व्यक्तीला डोस कसा मिळाला असा प्रश्न त्याला पडला. तसेच त्याने मेसेजमधील लिंकवर क्लिक केलं. आईचं नाव लिहिलेलं प्रमाणपत्रही डाऊनलोड झालं आणि त्यावर बूस्टर डोसची तारीखही लिहिलेली होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी दिनेश कुमार प्रेमी यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.