५० टक्के भारतीयांना कोरोना लस मोफतच; सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावालांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 01:37 AM2020-07-23T01:37:09+5:302020-07-23T06:42:01+5:30
सिरमखेरीज भारतातील आणखी ४ ते ५ कंपन्या कोरोना लसीवर काम करीत आहेत.
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात जगातील सुमारे १५० कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असतानाच अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांनी लस आपल्याला आधी मिळावी, यासाठी घाई सुरू केली आहे. त्यासाठी कोट्यवधींची रक्कमही कंपन्यांना देऊन टाकली आहे.
भारतातील ५० टक्के लोकांना मात्र ही लस मोफत दिली जाईल, असे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी जाहीर केले आहे.
ते म्हणाले की ५० टक्के भारतीयांना आम्ही तयार केलेली लस मोफत मिळू शकेल. कारण त्यासाठीची रक्कम केंद्र सरकार देणार आहे. देशातील गरिबांना या लसीसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ दिसत आहे.
आॅक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटनमधील कंपनीच्या सहकार्याने सिरम ही लस भारतात तयार करणार आहे. त्या लसीच्या काही चाचण्या शिल्लक असल्या तरी आतापर्यंतच्या निष्कर्षांच्या आधारे सिरमने पुण्यात लसीचे उत्पादन सुरू केले असल्याचे वृत्त आहे. ही लस डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल आणि पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल, असं पूनावाला यांनी मंगळवारीच सांगितले होते.
सिरमखेरीज भारतातील आणखी ४ ते ५ कंपन्या कोरोना लसीवर काम करीत आहेत. त्यापैकी भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्सिन या लसीच्या चाचण्या देशातील काही मोठ्या इस्पितळात सुरू झाल्या असून, दिल्लीच्या एम्समध्ये गुरुवारपासून त्या सुरू होतील. सुमारे १० हजार जणांवर चाचण्या होतील,अशी अपेक्षा आहे. ही लस १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध व्हावी, असा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले.
याशिवाय झायडॅक कॅडीला ही कंपनीही लस तयार करण्यात गुंतली आहे. मात्र सिरम आणि भारत बायोटेक यांची लसच भारतात लवकर उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत आहे. अर्थात जी कोणती लस सर्वात आधी तयार होईल, ती कोरोना योद्ध्यांना म्हणजेच, डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, रुग्णालयांतील अन्य कर्मचारी यांना दिली जाईल, हे स्पष्ट आहे.
कंपन्यांना चांगले दिवस
प्रख्यात फायझर आणि जर्मनीतील बायोएन टेक या दोन कंपन्यांनीही लस विकसित केली आहे. तिचे १०० दशलक्ष डोस डिसेंबरपर्यंत मिळावेत, यासाठी अमेरिकेने या कंपंन्यांना कोट्यवधी डॉलर्स दिले आहेत. अमेरिकेला २०२१ च्या अखेरपर्यंत या कंपन्या लस पुरवतील.
युरोपीय राष्टांनीही कोट्यवधी युरोद्वारे लस सर्वात आधी मिळवण्यासाठी काही कंपन्यांकडे मागणी नोंदवली आहे.
कोरोनामुळे जगातील शेअर बाजार खाली-वर हेलकावे खात असले तरी औषध कंपन्यांचे शेअर मात्र सर्वत्र वधारत आहे. बड्या देशांनी केलेली लसीची मागणी, त्यासाठी आधीच दिलेला निधी आणि यापुढील काळातही लसीची असणारी प्रचंड गरज यामुळे या कंपन्यांना चांगले दिवस आले आहेत.
प्रख्यात फायझर आणि जर्मनीतील बायोएन टेक या दोन कंपन्यांनीही लस विकसित केली आहे. तिचे १०० दशलक्ष डोस डिसेंबरपर्यंत मिळावेत, यासाठी अमेरिकेने या कंपंन्यांना कोट्यवधी डॉलर्स दिले आहेत. अमेरिकेला २०२१ च्या अखेरपर्यंत या कंपन्या लस पुरवतील.
युरोपीय राष्टांनीही कोट्यवधी युरोद्वारे लस सर्वात आधी मिळवण्यासाठी काही कंपन्यांकडे मागणी नोंदवली आहे. कोरोनामुळे जगातील शेअर बाजार खाली-वर हेलकावे खात असले तरी औषध कंपन्यांचे शेअर मात्र सर्वत्र वधारत आहे. बड्या देशांनी केलेली लसीची मागणी, त्यासाठी आधीच दिलेला निधी आणि यापुढील काळातही लसीची असणारी प्रचंड गरज यामुळे या कंपन्यांना चांगले दिवस आले आहेत.रशिया, चीनचा पुढाकार
जगातील १५० कंपन्या लस तयार करण्याच्या प्रक्रियेत असल्या तरी रशिया आणि चीन या दोन देशांनी ती तयार केल्याचा व तिच्या सुरुवातीच्या चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. चीनमध्ये तयार झालेल्या लसीची चाचणी आता ब्राझीलमध्येही होणार आहे. चीनच्या लसीकडे अमेरिकेनेही बारीक लक्ष आहे. या दोन देशांतील संबंध पार बिघडले असले तरी या लसीसाठी चीनचे सहकार्य व्ही मदत घेण्यास आम्ही तयार आहोत, असे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे.